इतिहासजमा
मागील आठवड्याच्या वर्तमानपत्रात छोटा लेख वाचला इतिहासजमा !
मे महिन्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरील घाटातील 'मिसिंग लिंक'चे उद्घाटन करून त्याला 'कनेक्टिंग लिंक' असे सार्थ नाव दिले. 'कनेक्टिंग लिंक' म्हणजे जोडणारा दुवा !
याविषयी आलेल्या लघुलेखामध्ये एक्सप्रेस वेवरील फूड-मॉल आता इतिहासजमा होईल असे म्हटले होते. पुणे-मुंबई प्रवासातील अनिश्चिततेचा घाट रस्ता आता वगळला जाऊन, वेळेची किमान अर्ध्या तासाची बचत या जोडणाऱ्या दुव्यामुळे होणार आहे. त्यामुळे प्रवासात अल्पोपहारासाठी थांबण्याची आवश्यकता उरली नाही. साहजिकच फूड-मॉलवरची गर्दी लक्षणीयरित्या कमी होईल आणि हा फूड-मॉल इतिहासजमा होईल असे या लेखात म्हटले आहे.
हा लेख वाचताना माझं मन भूतकाळात गेलं. मी भारतभर अनेक राज्यात, आशिया, आफ्रिका , युरोप आणि अमेरिका खंडात विस्तृत प्रवास केला आहे. जगभर प्रवास केला तरी पुणे-मुंबई प्रवासाची लज्जत न्यारी ! असा माझा अनुभव आहे आणि मत आहे. लहानपणी आजोळी जाताना सकाळी लवकर उठून सिंहगड एक्सप्रेसने मुंबईला जाणे हा एक सोहळा असायचा. गाडीत बसल्यावर लोणावळा येईपर्यंत डुलकी लागलेली असायची. मग घाटात करवंद, काकड्या, जांब अशा रानमेव्याची रेलचेल असायची. घाट उतरून कर्जत-कल्याण मागे पडलं, की मुंबईच्या वेशीवर आल्याची वर्दी मिळायची. उपनगरीयस स्थानकातून आपली गाडी धडाडत जाताना त्याकडे आशाळभूतपणे पाहणारे चाकरमाने दिसले किंवा एखाद्या लोकल ट्रेन ला मागे टाकून आपली गाडी पुढे जाताना दिसली की आपण किती भाग्यवान असं वाटून जायचं. आणि आपण जर डेक्कन क्वीनमध्ये असू, तर प्रामाणिकपणे सांगतो थोडा माज असायचा. परतीच्या प्रवासात कर्जत आलं की दिवडकरचा बटाटेवडा आणि लोणावळा आलं की मगनलाल चिक्की घेणं हा जणू कुळाचारच होता. डेक्कन क्वीनमधील नाकात वास भरून टाकणार ऐतिहासिक ऑम्लेट आणि पारशी डेअरीची कुल्फी घेऊन येणारा विक्रेता यावर किती पैसे उधळले आठवत नाही. हा कुल्फीवाला कुल्फीच्या थर्मोकोलच्या बॉक्समधून ड्राय आईसचे खडे हवेत उडवायचा आणि आपल्या शर्टच्या खिशात झेलायचा त्यामुळे दमल्या भागलेल्यांची सुद्धा करमणूक व्हायची.
काही कारणांनी रेल्वेने न जाता रस्तामार्गे जायची वेळ आली, तर खंडाळ्यातील राजमाची पॉइंट हे महत्त्वाचं आकर्षण होतं. मुंबईला शिकायला असताना अनेकदा एशियाडने मी पुण्याला आलो आहे. लोणावळा स्थानकात बस थांबली असताना त्या दहा मिनिटात धावत-धावत जाऊन मुख्य रस्त्यावरील नॅशनल चिक्की या दुकानातून चिक्की घेऊन परत वेळेत जागेवर येऊन बसणं याची एक वेगळीच मजा होती. (त्याकाळी लोणावळ्यातल्या सगळ्याच दुकानांना फक्त मगनलाल चिक्की असं नाव नव्हतं). मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सुरू झाला आणि गेल्या २०-२२ वर्षात पुणे-मुंबई आगगाडीचा प्रवास (माझ्यासारख्या अनेक जणांसाठी) आणि त्या प्रवासातील वरील सर्व नित्योपचार
जणू इतिहास जमा झाला.
गेल्या ५० वर्षात पुणे शहराचा चेहरा-मोहरा पूर्ण बदलला आहे. शाळेत जाताना लकडी पूल ओलांडून अलका टॉकीज चौकात सिग्नलला थांबलो की समोर गवळणीचा पुतळा होता. तो कधीच इतिहासजमा झाला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ चौकात प्रचंड मोठं आणि उंच उडणारं कारंज होतं. संध्याकाळच्या वेळी या कारंजाभोवती खूप गर्दी व्हायची. उन्हाळ्यात कारंज्याच्या बाजूने जाताना उडणारे तुषार अंगावर रोमांच उभे करायचे. या भागात वाहतूक वाढत गेली आणि हे वर उडणार कारंज इतिहासजमा झाल.
याशिवाय चतुर्श्रुंगीची यात्रा, यात्रेसाठी PMT च्या विशेष बसेस आणि त्यांचा तात्पुरता उभारलेला बस स्टॅन्ड, टेकडीवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल, ते उंच जाणारे पाळणे, कर्कश्य वाजणाऱ्या पिपण्या आणि विविध वस्तूंची बाजारपेठ, या सगळ्याचाच बाजार उठला.
मेट्रोच्या आगमनाच्या वर्दीबरोबर शिवाजीनगरचा एसटी स्टॅन्ड इतिहासजमा झाला आहे. मोबाईलच्या आगमनानंतर पूर्वी जागोजागी दिसणारे STD / ISD (आठवतात का काळे पिवळे बोर्ड ? ) इतिहासजमा झाले. त्याजागी आता मोबाइलला विक्री आणि दुरुस्तीची दुकाने आली आहेत.
एकेकाळी असलेली प्रसिद्ध स्थळ किंवा मानदंड हे विकास झाल्यावर किंवा काळाच्या ओघात कसे इतिहासजमा होतात याची ही काही उदाहरण.
लहानपणी हातात खेळातली गाडी असायची. त्याचे कोण कौतुक असायचे. त्यावेळी पाहिलेले स्वप्न - आपल्या हातात आहे तशी पण स्वतःची खरीखरी कार कधी येईल ? हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का ? असे वाटणारा तो काळ. तशी गाडी घेतल्यावर झालेला आनंद आणि अंगावर उठलेले रोमांच! अर्थात दोन्हीही गाड्या आपल्याला तितकाच आनंद देतात हे खरं. तसंच जुन्या घाटातील बोगदा काय आणि नवीन जोडणाऱ्या दुव्यातील बोगदा काय दोन्हीही तितकेच रोमहर्षक आहेत. एक सूर्य मावळला आणि दुसरा उगवला इतकच.
एकेकाळी कविवर्य श्री. वसंत बापटांनी 'दक्खन राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिलेही चालली खुशीत' अशी अतिशय मार्मिक कविता लिहिली होती. त्याच कवितेत शेवटी असं म्हटलं आहे -
ऐल ते पैल शंभर मैल - एकच बोगदा मुंबई पुण्यात
मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई लोहमार्ग एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस बंद होता. तरीही जगरहाटी (अर्थात पुणे-मुंबई वाहतूक) अविरतपणे चालू होती. फार काही कोणाचे अडले नाही. त्यादिवसात दक्खन राणीही बंद होती.
इतिहासजमा लेख वाचल्यावर अंगावर सर्र्कन काटा येऊन गेला - एक दिवस डेक्कन क्वीनसुद्धा इतिहासजमा होईल की काय !
सुहास पानसरे
हा लेख वाचून "जुनं ते सोनं "या म्हणीचा अर्थ कळला. अर्थात नव्या बदलांविषयी आकस नाही.
ReplyDeleteपुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे रस्त्यांमध्ये बदल होणं अपरिहार्य आहे.
युनिव्हर्सिटीचं कारण जर, चतुशृंगी ची यात्रा यांच्या आठवणींनी नोस्टॅल्जिक व्हायला होतं हे मात्र खरं !
दख्खनच्या राणीतून प्रवास करणाऱ्या अनेक पिल्लांमध्ये आपणही होतो... आता विस्टाडोम मधून प्रवास करण्याची इच्छा आहे पाहूया दख्खनची राणी इतिहास जमा व्हायच्या आधी तो योग येतो का...
फुटबॉल वरची गर्दी पाहता फुटबॉल कधी इतिहास जमा होईल असं मात्र वाटत नाही..
तिथला वडापाव, तिथली कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी खायला लोक डी टूर करतील पण" दत्त " ला नक्कीच भेट देतील.
एकच नंबर सूचना आहे सुहास कामाच्या व्यापात मध्यंतरी तुझ्या लेखणीने थोडासा विराम घेतला होता परंतु तुझे लेखणी आता ज्याप्रमाणे झरते आहे ते वाचताना खूप आनंद होत आहे ती लेखणी मात्र कधी इतिहास जमा होऊ नये ही इच्छा आहे.
ओघवत्या शैलीतील तपशीलवार वर्णन
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
Deleteधन्यवाद 🙏🏼🙏🏼
Deleteवा वा, परिपूर्ण लेख आणि सुंदर आठवणी. खरच, इतिहासजमा झालेल्या आठवणींचा इतिहास जागा केला. मी पुणे-मुंबई एक्सप्रेसवे मार्ग झाल्यानंतर च बघितला असल्याने त्या घाटाच्या, डेक्कनक्वीन च्या सुंदर वर्णनातून ते सगळं miss केल्याची खंत वाटते आणि तुमच्या लेखातून ते सगळ परत बघायला मिळते. सुंदर मनतरंग 👌👍
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼🙏🏼
Deleteविचारांचे तरंग मनात उमटणे आणि काही काळाने ते विरून जाणे, यापेक्षा ते अंतिमतः कागदावर शब्दांकित होणे यात सर्जनशीलतेची पूर्तता असते. मनातली अक्षरे जेव्हा कागदावर उमटतात, तेव्हा ती प्रक्रिया आपल्याला माणसाळून अधिक समृद्ध बनवत असते.
ReplyDeleteमाझा अनुभव काही वेगळा नाही.
धन्यवाद 🙏🏼🙏🏼
Deleteअतिशय सुंदर लेख...माझाही हा असाच अनुभव..वाचताना मी त्या काळात जावून मजा घेतली..मुलींना बरोबर घेऊन ट्रेनचा प्रवास आणि घाटातील प्रवास दोन्ही घरी म्हणजे मुंबई माहेर आणि पुणे आपले घर पोहोचताना भोवताली असणार्या डोंगर दर्या धबधबे आणि गार वारा अंगावर घेत आनंद घेत वेळ किती गेला कळायचे नाही. तापमानातील तफावत खूप होती..पण या प्रवासाची मजा आजही भुरळ पाडते हेच खरे..हे सर्व आत्तातरी इतिहास जमा माझ्यासाठी वाटत नाही ..अनुभव आजही रोमांच कारी आहे..नातवंडांना हा अनुभव द्यावासा वाटतो..असो ..नाहीतर माझा लेख लिहून होईल यावर..फार सुरेख वर्णन तुम्ही केले आहे...
ReplyDeleteमजा आली..
तुम्ही सुद्धा नक्की लेख लिहा.
Deleteमस्त! दिवाडकरांचे वडे. nostalgic memories 🙂! “दख्खनच्या राणीच्या बसून कुशीत”.. तसेच - हिरव्या हिरव्या रंगाची राई घनदाट. मस्त आठवणी! - राहूल वैद्य.
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼🙏🏼
Deleteअतिशय लिहिलेत
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼🙏🏼
Deleteखूपच ओघवते लिखाण! अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏼🙏🏼
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमी कधीच पुणे मुंबई असा ट्रेन चा प्रवास केला नाही. तो तुम्हीं ह्या लेखातून घडवलात ह्याबद्दल तुमचे आभार मानायला पाहिजे. नॉस्टॅल्जिया ही भावना जरा कॉम्प्लेक्स आहे. भूतकाळातली अशी घटना जी आज आठवून आपण आनंदी होतो पण ते आज उपभोगू शकत नसल्याने त्याला एक दुःखाची किनार असते. तुमच्या लेखात ही भावना फार सहजतेने उतरली आहे म्हणून हा लेख वाचताना आनंद होतो आणि इमोशनल ही होतो.
ReplyDeleteपुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत...
मनापासून धन्यवाद !
DeleteWell said.... आठवणी जाग्या झाल्या 👍
ReplyDeleteमनापासून !
Deleteअप्रतिम Nostalgic फार सुंदर सफर घडवली सुहास त्या काळाची जणू काही काळाचे चक्र उलटे फिरून त्या काळात गेलो सुंदर मस्त उतरवले आहे शब्दांमध्ये
ReplyDeleteमनापासून धन्यवाद !
DeleteDon't we all reminisce about the things that have become part of history and are with us only as distinct memories? Did the ancient Greek philosopher Heraclitus not say that the only permanent thing in life is change? Your blog has not only renewed your memories but also those of the readers. Do not forget, though, that even as one writes or speaks, the present has also turned into the past and has already become history. Keep writing; we enjoy it.
ReplyDeleteBeautiful and nostalgic article
ReplyDeleteमनापासून !
DeleteI recall the traffic jam in ghat section on old highway. I had returned from khopoli as ghat was declared closed due to an accident.
ReplyDeleteI also miss the Dhabia food of old days.
True. I remember it took me less than five hours to fly from Singapore to Mumbai and six hours from Mumbai airport to Pune.
Delete