शुभ मंगल सावधान अर्थात - सप्तपदी !
शुभ मंगल सावधान ! हे शब्द कानावर पडले आणि मन मोहरून गेलं. ....सगळ्याच नवरोबांचं लग्नाच्या घटिकेला असच होत. पण त्या सावधानतेचा इशारा मात्र तेव्हा ध्यानात येत नाही. लग्नाला तीन दशके झाल्यावर त्या इशाऱ्याचा गर्भितार्थ हळू हळू उमजत गेला.
शुभ मंगल सावधान ! ही निव्वळ मंगलाष्टका नसून धोक्याची घंटा आहे हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. लग्नात सप्तपदीचा विधी असतो. पूर्वीच्या काळी त्याचा संदर्भ 'सात जन्मी मी जोडीदाराला साथ देईन' असा होता. आज त्याचा व्यापक अर्थ म्हणजे 'फक्त सात जन्मच नाही तर त्या प्रत्येक जन्मात जोडीदाराबरोबर खरेदीलासुद्धा साथ देईन' असा झाला आहे. थोडक्यात सप्तपदीची सात पावले ही पुढे जाऊन सातशे पावले चालण्याची निव्वळ झलक म्हणून असतात.
आमच्या बाबतीत ही सातशे पावले म्हणजे मॉर्निंग (किंवा इव्हनिंग) वॉकची कधीच नसतात. एक तर माझ्या अर्धांगिनीला आहे तसा मला चालण्याचा उत्साह नाही.... आणि दुसरे कारण हे की दोघांचा चालायचा वेग व्यस्त आहे. त्यामुळे एकत्र चालायची सातशे पावले (सप्तशतपदी) ही बहुतेक वेळेस फक्त आणि फक्त शॉपिंगसाठीच चाललो आहे. आणि त्यातसुद्धा कसले शॉपिंग / खरेदी आहे त्यानुसार कितव्या पावलावर अडखळायला होईल ते ठरते.
यातील पहिला प्रकार म्हणजे भाजी खरेदी. या प्रकारात नवऱ्याचा अगदीच मोरू होऊन जातो. सगळ्या बायकांची ठाम समजूत असते की (आपल्या) नवऱ्याला भाजी निवडून कशी घ्यायची याची काही अक्कल नाही. त्यामुळे भाजी खरेदीच्या वेळेस नवऱ्याची सातशे पावले ही केवळ भरलेल्या पिशव्या घेऊन बायकोच्या मागे-मागे चालण्यासाठी असतात.
सप्तशतपदीचा दुसरा प्रसंग आणि भाजी खरेदीच्या एक वरची
पातळी - म्हणजे किराणा मालाची खरेदी.
हल्ली कोपऱ्यावरच्या किराणावाल्यापेक्षा
डी-मार्ट किंवा रिलायन्स-मार्ट सारख्या मोठ्या दुकानातील खरेदी, या दिव्यातून सगळ्या नवऱ्यांना जावे
लागते. आठवडाभर ऑफिसच्या धबडग्यानंतर शनिवारी किंवा रविवारी निवांतपणा मिळेल अश्या
भ्रमात असताना फर्मान सुटते की आठवड्याच्या खरेदीला जाऊया. माझ्या मेव्हण्यासारखे चाणाक्ष नवरे शुक्रवारीच ट्रेकिंग किंवा
सहलीचा बेत आखतात आणि स्वतःची या दिव्यातून सहीसलामत सुटका करून घेतात.
पण माझ्यासारखे ज्यांचे पाय डोंगरावर चढाई न करता सतत जमिनीवर असतात , ते अलगदपणे पाताळात (बेसमेंट
पार्किंगमध्ये ) कधी जाऊन पोहोचतात त्यांचे त्यांना कळत नाही.
तिथे गेल्यावर एक भली मोठी ट्रॉली घेऊन नवऱ्याच्या हातात सोपविली की त्या त्या नवऱ्याची पत्नी संपूर्ण स्टोअर पालथे घालून मनसोक्त खरेदीला मोकळी होते. इतका वेळ घर ते स्टोअर ही ‘ड्रायव्हर ड्युटी’, स्टोअरमधे ‘ट्रॉली-ड्रायव्हर’ म्हणून 'पुढील पानावर' चालू होते. बरं ती ट्रॉली कुठेही सोडून आपल्या आवडीच्या विभागात काही बघायला जायची सोय नसते - कारण ट्रॉलीत पैशाची पर्स, मोबाइल, घराच्या किल्ल्या आणि तत्सम मौल्यवान ऐवज ठेवलेला असतो.
सुमारे अर्धा ते एक तास पायपीट (सातशे पावले चालून)
झाल्यावर, यादीतील बहुतेक ऐवज मिळाला आणि थोडाफार 'उपलब्ध नाही' किंवा 'यावेळी त्यावर काही डिस्काऊंट नाही'
या
सदरात वर्ग झाला की या यात्रेची अंतिम फेरी सुरु होते. ही खऱ्या अर्थाने सप्तपदी
असते - कारण पैसे देण्याच्या रांगेत माझा सातवा क्रमांक असतो. पुढील गिर्हाइकाच्या
बिलात काहीतरी गडबड होणे, बिलाचे यंत्र व्यवस्थित न चालणे, एखाद्या वस्तूची किंमत फळीवर दिसणाऱ्या
किंमतीपेक्षा जास्त असणे, दिलेले क्रेडिट कार्ड
न चालणे (ज्याचे एक कार्ड चालत नाही त्याची पुढील अजून किमान दोन कार्डे अस्वीकृत
होतात असा माझा अनुभव आहे), कार्ड व्यवस्थित चालले तरी नेटवर्क हळू चालणे अश्या अगणित
अडचणींमुळे धर्मपत्नीसह ही साप्ताहिक सप्तपदी मात्र कंटाळवाणी होते.
आता बिलिंग काउंटरवर आपला क्रमांक येऊ घातला आहे अश्या वेळेस समस्त स्त्री वर्गाला हटकून पुढील आठवड्यात येणाऱ्या पाहुण्यांना आवडणारा एखादा पदार्थ आठवतो. किंवा यादीत लिहायचा राहून गेला पण अगदी वेळेवर आठवलं म्हणून 'पटकन घेऊन येते' असे म्हणून नवऱ्याची प्रतिक्रिया न जाणून घेता बायको त्या विविध पदार्थांच्या कपाटांच्या जंगलात गायब होते. यावेळेस मात्र आपल्या पुढच्याच बिल तयार होऊन पैसे देणे, वस्तू परत ट्रॉलीत टाकणे असले सगळे सोपस्कार दोन मिनिटात पार पडतात. आता आपला क्रमांक आलेला पाहून एका डोळ्यात हसू (आला आपला नंबर एकदाचा !) आणि दुसऱ्या डोळ्यात आसू (आत गेलेली बायको वेळेत परत येईल ना !) अश्या अवस्थेत आपण एकेक वस्तू काउंटरवर टाकत जातो. सगळ्या वस्तू संपल्या तरी आपली पत्नी अजून न आल्याने खजील व्हायची वेळ येते. रामायणातील सीतेला रावणाने पळवून तरी नेले होते. येथील समस्त सीतामाता आपणहून त्या स्टोअरच्या जंगलात अदृश्य होतात. अर्धवट झालेले बिल आणि रांगेतील क्रमांक सोडून जाणे शक्य नसते. म्हणून मोबाईलवर रिंग द्यावी तर तो मोबाइल आपल्याच हातातील ट्रॉलीत पहुडलेला असतो. आपल्या मागील गिर्हाइके कडू आणि जहाल नजरेने आपल्याकडे बघत असतात. अश्यावेळी एकेक क्षण युगा-युगासारखा वाटतो. काउंटरवरील कर्मचारी मात्र स्थितप्रज्ञ असतात. हा प्रकार त्यांना नेहेमीचाच असतो. रांगेतील लोकांच्या संयमाचा अंत पाहून धर्मपत्नी धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याचा थाटात हातात ती दुर्मिळ वस्तू घेऊन एकदाची काउंटरवर येते आणि आपली सुपर मार्केटच्या चक्रव्यूहातून सुटका होते.
या सप्तशतपदीत नवऱ्याचे स्थान फक्त पिशव्या उचलणे (किंवा ट्रॉली ढकलणे ) यापुरते मर्यादित आणि निम्नस्तरीय नसते. बहुतेक वेळेस नवऱ्याला अर्थमंत्र्याचा दर्जा असतो. देशाचा अर्थमंत्री नागरिकांकडून पैसे कापून घेतात, पण इथे घरातील अर्थमंत्र्यचा खिसा कापला जातो - हा तपशिलातील फरक !
याच माळेतील तिसरी सप्तशतपदी म्हणजे चकचकीत मॉलमधील
शॉपिंगची ! मॉलमध्ये शॉपिंग म्हणजे सगळं कसं 'फील गुड' असतं. संपूर्ण वातानुकूलित भव्य सुवासिक
वास्तूत कितीही तास - आणि कितीही रुपये घालवू शकतो. इथे पतीवर्गाचा वेगळाच अवतार असतो.
मंडईतील भाज्यांच्या पिशव्या नसतात आणि सुपर मार्केटमधील ट्रॉलीज नसतात. पण इथे वेगळाच
ग्रह राशीला येतो. महिला वर्गाची विविधरंगी (म्हणजे ज्या रंगांची नावसुद्धा नवीन वाटतात
अश्या रंगांच्या कपड्यांची) खरेदी असते. एक तर समस्त पतीदेव महिला विभागात (आपापल्या)
पत्नीच्या मागे मागे फिरत असतात. पुरुषांना इथे आधीच चोरट्यासारखे वाटत असत. त्यात
जरा लक्ष थोडं इकडे-तिकडे विचलित झालं, तर
तेव्हढ्यात आपली अर्धांगिनी कुठल्या अंगाला गेली ते अजिबात लक्षात येत नाही. बरं शोधक
नजरेने बघायला जावं तर त्याचा भलताच अर्थ निघून अनर्थ व्हायचा !
थोडा वेळ गेल्यावर धूमकेतू उगवावा तशी आपली
पत्नी हातात तीन-चार कुर्ती किंवा टॉप किंवा तत्सम कपडे घेऊन लगबगीने आपल्याजवळ येते. एकदाची खरेदी आटपली असे वाटेपर्यंत आपल्या भ्रमाचा
भोपळा फुटतो. त्या तीन-चार ड्रेसेसमधून कोणता आवडला, चांगला दिसतो किंवा फिट होतो अश्या
प्रश्नांचा भडीमार होतो. एकतर बहुतेक पुरुष वर्गाला यात फार गती नसते. त्यामुळे हा
यॉर्कर खेळून काढणे म्हणजे एक दिव्य असते. अर्थात आपल्या मताला तशी किंमत नाहीये हे
मुरलेल्या नवऱ्यांना चांगले माहित असते. 'हे डिझाईन चांगलं आहे आणि दुसऱ्याचा रंग वेगळा
आहे - तुला छान दिसेल' असं म्हणून सराईत नवरे त्या यॉर्करवर लीलया चौकार मारतात. आपलं
मतप्रदर्शन झाले की पत्नी तिचा व्हेटो वापरून - 'नक्की ठरत नाहीये' या सबबीखाली सगळे
कपडे बाद करून, दुसऱ्या दुकानाकडे मोर्चा वळवतात. त्यांच्या नवऱ्याची यावेळी अवस्था
अतिशय केविलवाणी झालेली असते. याची तुलना साप-शिडी
खेळताना ९९ पर्यंत पोहोचून सापाच्या तोंडी जाऊन २ क्रमांकावर ज्यांना यावं लागलं त्याच्याशीच
होऊ शकते. पुनःश्च हरिओम ! त्यादिवशी शनी वक्री
नसेल तर अनेक दुकाने हिंडून अखेरीस मनाजोगती खरेदी होते.
लहानपणी आई-आत्या-मावशी यांच्याबरोबर लक्ष्मी रोडवर खरेदीला जायचो. तास-न-तास खरेदी झाली की लहान मुल शहाण्यासारखी वागली म्हणून आईसक्रीमचा खाऊ मिळायचा. त्याचप्रमाणे वरील खरेदी झाली की आता नवरोबांना काहीतरी घ्यायला पाहिजे या कर्तव्यभावनेने मोर्चा त्यादिशेला वळतो. ठोकळेबाज Formal आणि Semi-Formal शर्टची निवड पटकन होते. आणि त्याक्षणी बायकोची फर्माईश येते की आपल्या पुढील महिन्यातील ट्रीपला साजेसा थोडा अतरंगी शर्ट किंवा टी-शर्ट घेऊया.
असे कपडे म्हणजे फुलाफुलांचे डिझाईन किंवा भडक रंगसंगती ! माझ्यासारख्या नेमस्त व्यक्तीला मुळातच अश्या कपड्यांची हौस नसते. पण गोवा किंवा कोस्टल कर्नाटक किंवा गेला बाजार बाली, मालदीव ट्रिपचे आरक्षण झालेले असते. तिथे असल्या चित्रविचित्र कपड्यात आपल्याला कोणी ओळखणारे नसते या भरवश्यावर या खरेदीला आपण तयार होतो. ते तसले २-३ शर्ट निवडून आपण ट्रायल रूममध्ये जातो. दोन मिनिटात त्यातील सर्वात विदुषकी शर्ट घालून पत्नीला पसंती विचारायला बाहेर यावे आणि 'कसा दिसतोय' म्हणायला जावे तर आपली सोडून दुसऱ्याचीच पत्नी तिथे उभी असते. आपली अवस्था विचित्र झालेली असते कारण त्या दोन मिनिटात स्वतःची धर्मपत्नी आपल्याला धर्मसंकटात टाकून गायब झालेली असते. समोर उभी असलेली दुसऱ्याची पत्नीच्या चेहेर्यावरील भाव पाहून आपण अजून कसेनुसे होऊन जातो. आपली धर्मपत्नी येईपर्यंतचा ३-४ मिनिटांचा वेळ ३-४ वर्षांसारखा वाटू लागतो.
खरी गम्मत तर पुढेच आहे. ते सगळे ३-४ शर्ट घालून बघितल्यावर त्यातला कोणताही घ्यायची फारशी इच्छा नसते. पण त्यातील सर्वात अतरंगी शर्टच आपल्या अर्धांगिनीला सगळ्यात भारी वाटतो. बराच वेळ वाटाघाटी केल्या तरी आपल्या प्रयत्नांना यश येत नाही. आणि तो नावडता (नावडतीचा नव्हे) शर्ट अक्षरशः आपल्या गळ्यात पडतो.
अशी सप्तशतपदी एकाच जन्मात चालावी लागली की पुढील सात जन्मात याच पावलावर पाऊल टाकून चालायचे आहे या विचारानेच त्या नवऱ्याचे दोन्ही पाय लटपटू लागले तर आश्चर्य ते काय ! शुभमंगल नंतरच्या सावधान या शब्दाचा खरा अर्थ तेव्हा लक्षात येतो - पण तोपर्यंत आपण अनेक पावले पुढे आलेलो असतो !
अश्या वेळी ‘घी देखा लेकिन बडगा नही बडगा नही देखा’ या म्हणीत सद्यकालीन सुधारणा करायला पाहिजे - बायको देखी मगर शॉपिंग नही देखी.
सुहास पानसरे
यथायोग्य वर्णन
ReplyDeleteभविष्यात हेच घडणार..
Deleteबहोत खूब
ReplyDeleteखूपच छान नर्मविनोदी लेख!
DeleteDoes not look like your own experience. Mine is quite different having lived in different cities n countries.
ReplyDeleteAll of the above mentioned are my own experiences.
Deleteछान लिहिलं आहे सुहास...
ReplyDeleteतुझ्या लेखनात तुझ्या पु. ल . देशपांडें वरच्या प्रेमाची झाक दिसते आहे !
अप्रतिम सुहास...
ReplyDeletePerfect वर्णन 👍
ReplyDeleteVery nice 👌
ReplyDeleteसप्त .. शत ... पदी ....
ReplyDeleteअजून पूर्ण वाचलेच नाही ... पण वाचतांना लेखन अगदी आपल्यासाठीच लिहिले आहे की काय असे वाटते आहे. ... आणि आपली सुद्धा अशीच गत झाल्यावर आपण कसे दिसत असू याची कल्पना करून हसू फुटते .... आणि ती अतरंगी शर्टाची चेहऱ्यावरचे रंग उडवणारी ट्रायल तर हसून हसून एकदम अधमुशी करणारी ... 🤩 एकदम मस्त ... आता यूट्यूब वर याचे मिश्किल शैलीत कथाकथन करा.
Very apt. Story of most couples.👌
ReplyDeleteVery realistic description 😜
ReplyDeleteअतिशय उत्तम मांडले आहे सर.
ReplyDeleteतुझ्या (आणि माझ्या) अनुभवांचं खूप छान शब्दांकन केलं आहेस सुहास
ReplyDeleteस्त्रीसुलभ सहजतेने अर्धांगिनीने तुझा पूर्णांगी 'मोरु' केल्याबद्दल तिचे अभिनंदन आणि वत्सा तुजप्रत केवळ आणि निव्वळ सहानुभूती ! 😄
ReplyDelete