काशीस जावे नित्य वदावे ! तीर्थयात्रा अर्थात पुणे मेट्रोची !

काशीस जावे नित्य वदावे ! तीर्थयात्रा अर्थात पुणे मेट्रोची !  या उक्तीनुसार, सच्चा पुणेकर एकदा तरी आपल्या स्वतःच्या पुणे मेट्रोतून प्रवास करायचे स्वप्न बघतो. पुणे मेट्रो लुटुपुटुच्या मार्गावर धावायला लागून वर्ष झाले तरी हा योग जुळून आला नव्हता. १३ ऑगस्ट उजाडला आणि आम्ही सकाळी चहा घेताना ठरवून  टाकले की आज आपण मेट्रो प्रवास करूया.

जगभर बस, ट्रेन, मुंबईतील लोकल,  विमान प्रवास, परदेशातील (लंडन, शिकागो) मेट्रो, ट्राम असा प्रवास केला असूनसुद्धा पुणेकरांना पुणे मेट्रोचे कौतुक काही वेगळेच आहे. कितीही मोठ्या भाड्याच्या घरात किंवा सरकारी क्वार्टरमध्ये राहिलो तरी स्वतःचे घर झाले की माणूस कृतकृत्य होतो.

एकदा मेट्रो प्रवास करायचा ठरल्यावर मेट्रोचे तिकीट कसे काढावे ? असा प्रश्न उभा राहिला. त्याचं मोबाइल ऍप आहे असे ऐकलं होत. हल्ली याकामी चि. अथर्व हाताशी असायचा.  त्यामुळे अश्या तंत्रज्ञानयुक्त कामाचा भार तोच वाहायचा. पण तो नुकताच अमेरिकेला रवाना झाल्याने, मला माझा उजवा हात निकामी झाला अस वाटून गेलं. त्याचवेळी या तांत्रिक बाबींत आपण मागे पडू लागलो की काय या भावनेने वाढत्या वयाची आठवण करून दिली. त्या क्षणी ठरवले कोणालाही काहीही न विचारता आपले आपण सगळे शोधून काढूया.

असे ठरवले आणि पहिला सुखद धक्का बसला. गूगल वर पुणे मेट्रोचे ऍप मिळाले जे अतिशय साधे आणि सोपे आहे. मेट्रोचे वेळापत्रक, दरपत्रक, ऑनलाईन  तिकीट सगळ्या सुविधा त्यावर उपलब्ध आहेत. नियमित वेळाने सेवा चालू आहेत हे पाहून आम्ही (मी आणि सौ) संपूर्ण मार्गाचा फेरफटका मारूया असे ठरवले.  वनाझ ते सिव्हिल कोर्ट, तेथून बदलून PCMC आणि परत असा मार्ग नक्की केला. वनाझ स्टेशनला पोहोचलो - आणि पहिला (सुखद नसलेला) धक्का बसला तो म्हणजे - जवळपास कुठेही चारचाकी पार्किंगची सोय नाही याचा. म्हटलं तर जवळच्या, म्हटलं तर दूरच्या एका सोसायटीबाहेरील रस्त्यावर गाडी पार्क करून मेट्रो स्टेशनवर आलो. मुंबईकरांचे रोजचे 'घर ते स्टेशन' अंतर यापेक्षा कितीतरी जास्त असते आणि ते पायी पार करतात हे लक्षात आले. उंच (सरकते) जिने चढून तिकीटबारीवर आलो. तेथील गर्दी पाहून बाकीच्या पुणेकरांना आजच मेट्रो प्रवास करायची धाड का भरली असा विचार मनात येऊन गेला.  अश्या वेळी मेट्रोचे ऍप कामी आले आणि त्यावर चुटकीसरशी तिकीट काढले आणि मोठी रांग मागे टाकून आम्ही थेट प्लॅटफॉर्मवर आलो.

प्लॅटफॉर्म जवळ जवळ ओसंडून वाहत होता. प्लॅटफॉर्मवरील सगळ्यांच्या चेहेऱ्यावर कुतूहलमिश्रित आनंद होता. कधी एकदा मेट्रो येते याची उत्कंठा होती. यथावकाश एक मेट्रो कसलाही आवाज न करता "संथ वाहते कृष्णामाई" या गीताची आठवण करून देत तिच्या संथ चालीने पण रुबाबात प्लॅटफॉर्मवर आली. आम्ही सगळे आत चढून स्थानापन्न झालो. दारे आपोआप बंद झाली आणि आमचा पहिला-वहिला मेट्रो प्रवास सुरु झाला.

ज्या रस्त्यावरून मुंगीच्या गतीने कित्येकदा प्रवास केला त्या रस्त्याच्या शब्दशः "वरून" प्रवास सुरु झाला. आपलेच रोजचे पुणे नवे-नवे वाटू लागले. वातानुकूलित सुखकर प्रवास आणि दूर दूरचे दिसणारे पुणे - असा हा नजारा ! इकडे पाहू की तिकडे ! लहानपणी पेशवे उद्यानातील फुलराणीच्या सफरीची आठवण आली. केस पांढरे झाले असले तरी (मेट्रोतील माझ्यासारखे अनेकजण) पुन्हा एकदा जणू बालपण जगत होते ! पौड रस्ता मागे टाकून कर्वे रस्त्याला लागलो आणि थोड्याच वेळात पुण्याचा केंद्रबिंदू अर्थात डेक्कन जिमखाना आलं. लकडी पूल, भिडे पूल, Z ब्रिज, बालगंधर्व पूल, नवा पूल यांचं सौन्दर्य अजूनच ठळकपणे डोळ्यात भरलं .... ते कॅमेऱ्यात बंदिस्त करायची जबाबदारी नैसर्गिकरित्या "सौ"वर सोपवली. वनाझहुन निघून १५-२० मिनिटे झाली असतील आणि पुढील स्टेशन सिव्हिल कोर्ट ऐकून चकित झालो. जे अंतर पार करायला किमान अर्धा तास लागतो तो प्रवास त्याच्या अर्ध्या वेळेत पूर्ण झालासुद्धा ! पुणे मेट्रोच्या यशाचे हे इंगित आहे. लवकरात लवकर मेट्रोच्या तीनही मार्गिका (PCMC ते स्वारगेट, वनाझ ते रामवाडी आणि शिवाजीनगर ते हिंजवडी) संपूर्ण मार्गावर धावू लागल्या की पुणेकरांना सुखद आणि जलद प्रवास करता येईल.    

सिव्हील कोर्ट स्टेशनबद्दल एव्हाना खूप काही ऐकून होतो. भव्य आणि जागतिक दर्जाचं भूमिगत स्टेशन ! या स्टेशनात उतरल्यावर याची प्रचिती आली. पायाभूत सुविधेचा उत्तम उदाहरण म्हणून हे स्टेशन आहे ! पण प्रत्येक गोष्टीला नजर लागू नये म्हणून आपण एक काळा डाग (तीट ) लावतो - त्याचं तंतोतंत पालन इथेही केलं आहे. सिव्हिल कोर्ट स्टेशनच्या वरच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उतरलो. आता PCMC ची ट्रेन कुठे येईल आणि तिकडे कसे जायचे याबद्दल एकही दिशादर्शक या प्लॅटफॉर्मवर नाही. एका दिशेला वनाझ आणि दुसऱ्या दिशेला रामवाडी अश्या पाट्या होत्या. पण दुसऱ्या मार्गिकेने जायचे तर तश्या पाट्या लावायचे राहून गेले आहे.  असो.  

सर्वात आधी असे भूमिगत स्टेशन मी लंडन वॉटर्लू हे पाहिलं होत. जमिनीच्या पोटात खोल खोल जाणारे सरकते जिने - तेथील चकचकीत प्लॅटफॉर्म आणि बोगद्यातून घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाजाची वर्दी देत येणारी ती मेट्रो ट्रेन.... वॉटर्लूच्या भूमिगत ट्रेनशी  स्पर्धा करणारी PCMC कडे जाणारी ही ट्रेन थोड्याच वेळात आली. रविवार असल्याने मेट्रो पिकनिक म्हणून निम्मे पुणे बाहेर आले की काय इतकी गर्दी ! या गर्दीत आबाल-वृद्ध, कुटुंबासहित आलेले , मित्र-मैत्रिणी सगळेच उत्साहात ह्या सफारीचा आनंद घेत होते. अनोळखी लोक एकमेकांशी गप्पा, एकमेकांचे फोटो काढून देणे यात रमले होते.  

PCMC च्या मार्गावरून जाताना मन परत भूतकाळात - बालपणात गेलं. मुंबईला आजोळी गेलो की लोकल आणि दुमजली बस याच आकर्षण असायचं. दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर सगळ्यात  पुढच्या सीटवर बसायला मिळालं की आकाशात उडतोय असं वाटायचं. पुण्यात ही मजा नव्हती. काही वर्षांनी शाळेत असताना पुण्यात 'मनपा ते निगडी' अशी दुमजली बस सुरु झाली होती. त्यावेळी पुण्याच्या दुमजली बसने केलेला प्रवास अजूनही लख्खपणे आठवतो आहे. त्यानंतर कधीतरी 'पुणे-लोणावळा' लोकल प्रवास केल्याचाही आठवतंय. आता मुंबई मेट्रोच्या आधीच पुण्याच्या मेट्रोचा अनुभव घेतला. 

पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. पण पुणे मेट्रोने काही बाबीत उणेपणा अंगीकारला  आहे. वर म्हटल्याप्रमाणे  स्टेशनजवळ किमान दुचाकी पार्किंग अत्यावश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे तो प्लॅटफॉर्मचा. अनेक स्टेशन्सवरील प्लॅटफॉर्म ग्रॅनाईटचे आहेत. त्यादिवशी मेट्रो प्रवासाची जितकी मजा आली तितकीच काळजी मला प्लॅटफॉर्मवर चालताना घ्यावी लागत होती. पावसाळ्यात आणि ऑफिसच्या गडबडीत प्रवाश्यांची किती तारांबळ उडेल ते देव जाणे. ट्रेनमधील बहुतेक उद्घोषणा व्यवस्थित ऐकूच येत नव्हत्या. ही बाब मेट्रोच्या बाकी दर्जाला नक्कीच गालबोट लावणारी आहे. प्लॅटफॉर्मवर पुढील ट्रेन किती वाजता किंवा किती वेळाने येईल याची माहिती देणारे फलक नव्हते (जे होते त्यावर ही माहिती येत नव्हती). शेवटचा आणि एक विचित्र प्रकार म्हणजे प्लॅटफॉर्मवरील प्रवेशाचा.  जगात सगळीकडे एक समान पद्धत आहे. प्रवेशासाठी एक आडवी पट्टी (बॅरियर) असते - जी आधी बंद असते आणि तिकीट स्कॅन झाले की उघडते. मग आपण पटकन त्या चिंचोळ्या जागेतून पुढे जायचे. पण पुणे मेट्रोचे येथील सेटिंग गंडलेले आहे. तिकीट स्कॅन करायला गेलो तर बॅरियर Open स्थितीत होते. गर्दीमुळे तसे ते उघडे असेल असं मला वाटलं. तिकीट स्कॅन केलं आणि मी पुढे जाऊ लागलो. नेमके ते स्कॅन बरोबर झाले नाही. त्यामुळे ते बॅरियर एकदम खटकन बंद झालं. नशीब माझे की त्याच्यामध्ये अडकलो नाही. अश्या जगावेगळ्या (अ)सुविधेचे प्रयोजन मला अजून समजले नाहीये. माझे एक मित्र #DasarpEdihb यांना याचा फटका बसला ते त्यांनी यापूर्वीच FB वर सांगितले आहे. वरील त्रुटी तश्या किरकोळ आहेत. लवकरच त्यात सुधारणा होईल अशी आशा आहे.      

जागतिक दर्जाचा हा प्रकल्प - पण पुण्याला मिळायला खूप उशीर झाला आहे. पुण्याचा विस्तार पाहता येथील रस्ते, उड्डाण पूल, मेट्रो आणि विमानतळ या पायाभूत सुविधा गरजेच्या मानाने किमान एक दशक मागे आहेत. इतर वेळी खवचट म्हणून प्रसिद्ध असणारा पुणेकर याबाबतीत मात्र निमूटपणे सगळे सहन करत आहे.     

वनाझ - सिव्हिल कोर्ट - PCMC - सिव्हिल कोर्ट -  वनाझ  असा हा  नव्या नवलाईचा दोन तासांचा पण सुखकर प्रवास !  गेले वर्षभर कोणत्याही गप्पांमध्ये मेट्रोचा विषय निघाला की आपण अजून मेट्रो प्रवासाने पावन झालेलो नाही याच वैषम्य वाटायचं. आता मात्र कोणी विचारला की अभिमानाने सांगू शकतो की "हो - मी मेट्रोने प्रवास केला आहे." 

पु. ल. देशपांडे यांच्या 'मुंबईकर - पुणेकर - नागपूरकर' मध्ये पुणेकरांच्या व्यवच्छेदक लक्षणात - सच्चा पुणेकर व्याख्यानाला जातो - आणि प्रमुख वक्त्याला - " आपल्याशी यावर एकदा चर्चा करायची आहे" अस एक लक्षण सांगितलं आहे. आज पु. ल. आपल्यात असते तर त्या लक्षणात अजून एक भर पडली असती -  खरा पुणेकर आठवडाभर आपल्या दुचाकी (किंवा) चारचाकीने कार्यालयात जाईल. आणि सुट्टीच्या दिवशी पिकनिक म्हणून मेट्रो प्रवास करून आणि त्यावरील टिप्पणी समाज माध्यमांमध्ये करेल ! काय खरंय ना !


सुहास पानसरे

Comments

  1. वाचून परत मेट्रोची सफर घडल्यासारखे वाटले..

    ReplyDelete
  2. यथार्थ वर्णन सुहास ! मीही महिनाभरापूर्वी अगदी याच मार्गावर मेट्रोप्रवास अनुभवला. माझेच अनुभव शब्दबद्ध केलेस असे वाटले.

    ReplyDelete
  3. इंजीनियरिंग ला असताना वेगवेगळ्या असाइनमेंट्स घाईघाईत एकदाच्या पूर्ण करून वेळेत सबमिट करण्याच्या नादात अनेक बारीक बारीक त्रुटी राहून गेल्या तरीही भोज्ज्या केल्याचं समाधान मिळवण्यासारखं आहे हे मेट्रोचं तथाकथित पूर्णत्व....

    त्यामुळे आता उद्घाटनाचा झेंडा फडकवल्यानंतर अनेक छोट्या वाटणाऱ्या पण अत्यंत गरजेच्या सुविधांकडे कोण पहातो! आता गंगेत घोडं न्हालं हे ही नसे थोडके. पार्किंगला अगदी ऐसपैस नसली तरी बऱ्यापैकी जागा असायला हवी, दिशादर्शक फलक (नॅव्हिगेशनल गाईड्स), Onboard well functioning PA systems, non-slip quality of platforms अश्या क्षुल्लक(?) गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकायला हवं 😐. एकूणच हे अतिशय उशिरा सुचलेले शहाणपण असल्याने पार्किंगच्या जागेचा अभाव गृहीतच आहे.

    या आणि यापुढे येणाऱ्या अश्याच अनुभवानंतर पुणेकरांची सहनशीलता मात्र वाढीस लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही 😀.

    ReplyDelete

  4. मी आधी कधी तरी लंडन च्या ट्यूब ची माहिती वाचली होती आणि ती जेंव्हा सुरु झाली तेंव्हा लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या हे वाचले होते. तुमचा हा लेख वाचून मला त्याची आठवण झाली. थोडक्यात आपण १०० वर्षे मागे आहोंत का काय असाही वाटायला लागलं. पण आपली मेट्रो बरीच ऍडव्हान्स असावी. पण एखाद्या गोष्टीच पूर्णत्व वा कंप्लिटनेस आपल्याला जमत नाही. किंवा त्याची ओढ नाही म्हणून अशा वरवर लहान वाटणाऱ्या त्रुटी राहतात. पण त्या पुढे त्रासदायक होऊ शकतात. आणि एकदा गोष्टी झाल्या कि पुन्हा त्याचे नीट
    मेन्टेनन्स आपण करत नाही हा आपला दुसरा मुख्य वाईट गुण.
    पण निदान मेट्रो मध्ये तरी असले प्रकार घडणार नाहीत आणि आपली मेट्रो लंडन ट्यूब किंवा न्यूयॉर्क सबवे च्या तोडीची होईल अशी आपण अपेक्षा करू या.
    तुमचा लेख इतका मार्मिक आहे आणि दर्शन घडविणारा आहे कि मला हि मेट्रो मधून प्रवास करायची अतीव इच्छा होते आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

अस्पृश्य राजकारण

।।ग्राहक देवो भव ।।