पिढ्यान पिढ्या!

 १९७५-७६ चे दिवस. मी चौथी पाचवीत असेन. डोक्यावरचे केस वाढले की रविवारी आमची तीर्थयात्रा आमच्या तीर्थरूपांबरोबर जवळच्या कटिंग सलूनमध्ये ठरलेली असायची. सर्व सलूनमधील दृश्य जवळपास एकसारखेच असायचे - एक  आरश्याची भिंत, त्यापुढे ३-४ चकचकीत खुर्च्याखुर्च्यांना स्वतःचे पायपाठमान असे अवयव. खुर्चीसमोर एक फळी ज्यावर पाण्याचा फवाराविविध क्रीम्सकंगवेकात्र्या आणि ते कटिंगचे भीतीदायक मशीन! भीतीदायक अश्यासाठी की त्या मशीनने केसांच्या ऐवजी चुकून मानचं कापली जाईल का - अशी शंका यायची.   

अजून लहानात गणना होत असल्याने त्या खुर्चीवर एक फळी आडवी टाकली जाई. त्यावर बसायची (अनावश्यक) भीती वाटायची. त्यावर बसून कटिंगच्या वेळेस न्हाव्याने हातात मशीन घेतले की ही भीती चक्रवाढ पद्धतीने चेहेऱ्याचा ताबा घ्यायची.  (सांगायला संकोच होतो पण हा सोपस्कार पूर्ण होईपर्यंत अनेकदा भोकाड सुद्धा पसरलेले आहे.) उंची पुरेशी वाढल्यावर कोपऱ्यात ठेवलेल्या त्या फळीकडे तुच्छ नजरेने पाहून रुबाबात खुर्चीत जाऊन बसल्याचे मला स्पष्ट आठवते आहे.  ही परंपरा वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या अशीच चालत आली आहे.

काळाचा पडदा झर्र्कन १५-१७ वर्षे पुढे नेऊया. माझा मुलगा अथर्व दीड-दोन वर्षांचा असेल. त्याच्या आजोळी आम्ही गेलो होतो. बिल्डिंगच्या तळमजल्यावर कटिंग सलून होतं. तेथील कर्मचारी आणि मालक सगळे ओळखीचे.

या सलूनमध्येसुद्धा पूर्वीसारखीच आरश्याची भिंतत्यापुढे ३-४ चकचकीत खुर्च्याखुर्च्यांना स्वतःचे पायपाठमान असे अवयव. खुर्चीसमोर एक फळी ज्यावर पाण्याचा फवाराविविध क्रीम्सकंगवेकात्र्या आणि ते कटिंगचे भीतीदायक मशीन! एक पिढी पुढे सरकली तरी सलून मात्र 'जैसे थेहोते.

अथर्वला घेऊन मी आणि माझे सासरे सलूनमध्ये आलो. अथर्वला खूप उशीरा धोक्याची जाणीव झाली. थोडेफार रडून झालं असेलसलूनचे मालक म्हणाले, "काही काळजी करू नका. तुम्ही त्याला मांडीवर घेऊन बसा -  पाच मिनिटात त्याचे केस कापून होतील". पण 'विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही'. अथर्वने टिपेचा सूर लावला. कितीही प्रयत्न केले तरी तो शांत होईना. अखेरीस मी आणि माझ्या सासऱ्यांनी त्या बिचाऱ्या (मुक्या म्हणणे शक्यच नाही) जीवाला घट्ट पकडून ठेवले. पण कटिंग  होईपर्यंतच्या पाच मिनिटात त्याने संपूर्ण गल्ली दणाणून सोडली होती. एव्हढे रडायला काय झाले - 'तो पडला की काय' बघायला त्याची माउली वरच्या मजल्यावरून पळत पळत खाली आली. ४-५ मिनिटात त्याच्या कटिंगचा सोपस्कार पार पडला. पुढील एका मिनिटात गडी शांत झाला आणि आजोबांच्या कडेवरून हसत हसत घरी परतला.  थोडक्यात काय पिढी पुढे सरकली तरी काही गोष्टी त्या सलूनप्रमाणेच 'जैसे थे'!

अजून १७-१८ वर्षे पुढे येऊया. मागच्या आठवड्यात मी कटिंगला गेलो होतो. या सलूनमध्ये सुद्धा पूर्वीसारखीच आरश्याची भिंतत्यापुढे ३-४ चकचकीत खुर्च्याखुर्च्यांना स्वतःचे पायपाठमान असे अवयव. खुर्चीसमोर एक फळी ज्यावर पाण्याचा फवाराविविध क्रीम्सकंगवेकात्र्या आणि ते कटिंगचे भीतीदायक मशीन!

पण या  केशकर्तनालयात काळानुरुप काही बदल दिसत होते. एकतर संपूर्ण सलून थंडगार (air conditionedहोते. लहान मुलांची ती फळी जाऊन त्याठिकाणी गुबगुबीत अशी उशी आली होती. त्यामुळे भीतीचा एक मुद्दा निकालात! पिढी पुढे सरकली तसं सलून सुद्धा कात टाकलेले दिसत  होते.

केशकर्तन चालू असताना मला आरश्यात एक लहान पिल्लू आपल्या पिताश्रींच्या मांडीवर निवांत बसून - आरडाओरडा सोडा - साधी चुळबुळही न करता शांतपणे केस कापून घेत होत असल्याचे दिसले. केशकर्तनकार त्याची मान कधी इकडे वळवून तर कधी तिकडे करून त्याचा कार्यभाग साधत होता. मला त्या छोट्याच खूप कौतुक वाटलं. रडणे तर नाहीचपठ्ठ्या हूं की चू करत नव्हता. पिढी पुढे सरकली तसे सलूनने कात टाकली आणि नवी पिढीसुद्धा धीट झाली म्हणायची ! 

पुढली पिढी ही जास्त हुशारचुणचुणीत निघते हे अनेकदा अनुभवलं होत. पण आमच्यापेक्षा ही पिढी इतकी बिनधास्त असेल असं वाटलं नव्हतं.  माझ्या लहानपणीटेलिव्हिजन म्हणजे घरातील दुसरा देव्हारा होता. लहान मुलांनी (म्हणजे अगदी नववी दहावीत जाईपर्यंत) त्याला अजिबात हात लावायचा नाही असा खडा नियम होता. इंजिनियरिंगच्या प्रयोगशाळेत संगणक वापरायचा असेल तर पूर्वपरवानगी लागत असे. मनगटी घड्याळ हे बहुतेक जणांना दहावीचं बक्षीस म्हणून मिळे. आजकालच्या जमान्यात TV, Sound Systemमोबाईल्सवायफाय ची सेटिंग्स आणि पासवर्ड या सगळ्यांसाठी घरातील वडिलधाऱ्यांना लहानांवर अवलंबून रहावं लागत.

यामुळे आजच्या जमान्यात मुले पटकन नव्या गोष्टी आणि तंत्रज्ञान (technology) आत्मसात करतात. पण म्हणून त्यांची प्रगती इतकी झाली की मशीनच्या कटिंगला (की कटिंगच्या मशीनला) त्यांनी धूप घालू नये! हे माझ्यासाठी पचायला जरा कठीणच होते. त्यामुळे मी त्याच्याकडे पुनःपुन्हा कौतुकाने पाहत होतो.

माझं लक्ष जरा दुसरीकडे गेलं असेल आणि तेव्हढ्यात अचानक मला अपेक्षित असा त्याचा त्याचा टिपेचा सूर ऐकू आला. इतका वेळ शांतपणे केस कापून घेणाऱ्या बाळाला इतक्या उशिरा त्यातील भीतीची जाणीव झाली की काय - म्हणून मी चमकून त्याच्याकडे पहिले....... आणि एका क्षणात माझ्या मनातील कोड सुटलं.

त्याच्या तीर्थरूपाने त्याच्या पुढील मोबाइल काढून घेतला होता आणि इतका वेळ त्यावर कार्टून पाहण्यात गुंग असणारा हा गडी - कटिंगपेक्षा कार्टूनमध्ये व्यत्यय आल्याने चवताळला होता.

त्याक्षणी मला खात्री पटली की पिढी पुढे सरकली तरी सलूनमधील नजारा 'जैसे थे'  आहे ?????

सुहास पानसरे 

Comments

  1. दर महिन्यात सामोरं जाव्या लागणाऱ्या एका कर्मकांडाचं अचूक वर्णन केलं आहेस.

    ReplyDelete
  2. साध्याशा प्रसंगाचे खुमासदार वर्णन केले आहेस सुहास... 'मोबाईल देवो भव' अशीच सध्याच्या पिढीची अवस्था झालेली दिसते मग ते कटिंग असो किंवा लहान मुलांच जेवण असो ! परदेशात लहान मुलांच्या आरडाओरड्याचा बाकीच्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या तोंडामध्ये रबरी भूत घालतात आताचे पालक मुलांच्या हातात मोबाईल देऊन आपला कार्यभाग साधतात

    ReplyDelete
  3. छान आठवणी.

    ReplyDelete
  4. फारच सुंदर...आवडले...दुकानाचे रूपडे बदलले खरे...तेव्हा किती देत होतो..आज काय द्यावे लागतात?रूपये?

    ReplyDelete
  5. झकास ! शेवटचा टर्न ही अनपेक्षित होता.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !🙏🏼🙏🏼

      Delete
  6. मस्तच

    ReplyDelete
  7. सुहास, खूप छान! माझ्या लहानपणी केशकर्तनकर्मी घरी येऊन पाटावर बसवून केस कापत असतं. मला त्याची आठवण झाली. कोरोना काळात दोन वर्ष सलूनचा दौरा झाला नाही हे आत्ता जाणवते.
    - शशांक पुरंदरे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! मुंबईला आजोळी गेलो की तिथे घरी न्हावी यायचा. त्याची एक विशिष्ट बॅग असायची ज्यात सगळी आयुधं असायची. पुण्यात मी सहसा घरी येऊन कटिंग पाहिलेली नाही.

      Delete
  8. सुहास, मस्त.. लिहीतच रहा.. 💐

    ReplyDelete
  9. धन्यवाद !

    ReplyDelete
  10. माणिकराव बामणेNovember 28, 2022 4:24 pm

    छान वर्णन केले आहे. अगदी हुबेहूब प्रसंग आठवतात... माझ्या कडे गावी "पैलवान फॅशन" हा एक प्रकार होता... जवळ जवळ दहावी पर्यंत सलून वाल्याला पैलवान फॅशन कटिग करायला सांगायचो...
    सुहास, तुझे सर्व लेख उत्कृष्ट असतात... छान वाटले... तुझ्या पुढच्या लेखाची प्रतीक्षा करतो ..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद माणिक !

      Delete
  11. खूपच छान वर्णन केलयं!!! भाषा खूप खुशखुशीत व ओघवती आहे!!!

    ReplyDelete
  12. धन्यवाद !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

अस्पृश्य राजकारण

।।ग्राहक देवो भव ।।