अस्पृश्य राजकारण
"आपल्या ग्रुपवर राजकीय पोस्ट्स नको!"
गेल्या महिन्यात माझ्या व्हॉट्सअपच्या दोन ग्रुप्सवर काही दिवसांच्या अंतरात या आशयाच्या पोस्ट्स आल्या.
आज समाजमाध्यमे आपली अविभाज्य
अंग झाली आहेत. कर्णाला जशी
जन्मजात कवच-कुंडले होती तसेच आपल्या जन्माच्या
वेळीच परमेश्वराने प्रत्येकाचे ‘इंस्टाग्राम’, ‘फेबु’, ‘व्हॉट्सअप’ खातं त्याच्या प्रारब्धाला जोडूनच पाठवले की काय असं वाटतं. या समाज
माध्यमातून आपण उत्स्फूर्तपणे, मुक्तपणे व्यक्त होत असतो. व्हॉट्सअपवर अनेक ग्रुपवर आपण सभासद असतो आणि एका क्लिकसरशी आपला संदेश कित्येक
जणांपर्यंत पोहोचवतो. हे ग्रुप्स पण अनेक प्रकारचे असतात. विशिष्ट धाग्याने
गुंफलेले - समान राजकीय विचारसरणीचे, एखाद्या विषयाला वाहिलेले (पु ल प्रेमी, संगीतप्रेमी - अगदी ‘मराठी सिरियलला वैतागलेला’ सुद्धा एक ग्रुप असल्याचे मला माहित आहे). अनेक ग्रुप कौटुंबिक किंवा मित्रमंडळींचे असतात.
अश्या ग्रुपमध्ये कौटुंबिक, साहित्य, संगीत, क्रीडा, राजकीय, सामाजिक इ. इ. विषयांवर चर्चा आणि पोस्ट्सची देवाण
घेवाण होत असते. हे ग्रुप विशिष्ट विचारसरणीनुसार बनलेले नसल्याने अनेकदा
ग्रुपवरील सभासदांमध्ये मतमतांतरे असतात. कधी कधी त्यातून शाब्दिक चकमकी होतात.
अतिरेक झाला तर एखादा सभासद ग्रुप सोडून जातो. आपण सगळेच जण अश्या अनेक ग्रुपचे सभासद असतो आणि मीही त्याला
अपवाद नाही.
आणि म्हणूनच "आपल्या ग्रुपवर राजकीय पोस्ट्स नको!" अश्या पोस्ट्स आल्या आणि मी चमकलो! दोन्ही ग्रुप्समधील सगळेजण एकमेकांना गेली कित्येक वर्षे (२०-३० वर्षे) ओळखत
आहेत. वर म्हटल्याप्रमाणे त्यातील अनेकांच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत. कोणी
क्रिकेटचा चाहता आहे तर कोणी टेनिस. कोणी पट्टीचा ट्रेकिंगवीर आहे तर कोणी
शेयर्समध्ये तज्ज्ञ. विविध विषयांवर येणाऱ्या पोस्ट्सना वेगवेगळे सभासद त्यांच्या
मर्जीनुसार उत्तर देतात, दाद देतात, खोडून काढतात, पाठिंबा देतात. युक्रेन वादात ‘झेलेन्स्की बरोबर की पुतीन’ याची चर्चा रंगली तसेच ‘कोरोना महामारी खरी आहे की जागतिक कट’ यावर सुद्धा हिरीरीने चर्चा
झडल्या आहेत. असे असताना राजकीय विषयाचे इतके वावडे का?
यामध्ये राजकारणाविषयी तिरस्कार आहे का भीती !
समाजात मध्यमवर्ग तसा अतिशय
दबकून असतो. खाजगीत स्वतःची मते कितीही स्पष्ट आणि निर्भीडपणे मांडली तरी समाजात
आणि समाजमाध्यमात व्यक्त होताना मात्र यातील बहुतेकजण सावध असतात. एक तर स्पष्ट
आणि कधी कधी स्फोटक मत व्यक्त करून उगीच वाद कशाला ओढवून घ्या आणि त्यापुढे जाऊन
विशिष्ट बाजू घेण्यापेक्षा (दिखाऊ) समतोल
भूमिका घेण्याकडे सगळ्यांचा कल असतो. राजकारणातील कार्यकर्ते आणि नेते समाज
माध्यमांवर त्यांचे प्रखर विचार मांडत असतात. त्यांच्या मागे त्यांचे पाठीराखे
असतात. उद्या एखाद्या पोस्टबद्दल राळ उडाली तर त्याला तोंड द्यायला सक्षम असतात.
पण सामान्यजनांचे तसे नाही. गेल्या काही महिन्यातील घटनांनुसार एखादी जहाल पोस्ट
चांगलीच महागात पडू शकते. म्हणून सामान्य जनता याबाबतीत बिचकून असते. पण त्याचा
अतिरेक करून ग्रुपवर राजकीय मतप्रदर्शन करूच नये हे मात्र अविवेकी नाही का!
आपल्या समाजमानसात राजकारण आणि
राजकारणी यांची एक विशिष्ट (नकारात्मक) प्रतिमा आहे. एखाद्या मुद्द्यावर एखाद्या
राजकीय पक्षाने विरोधाची भूमिका घेतली की त्यांचे विरोधक, 'या विषयाचे राजकारण करू नका' असा धोशा लावतात. राजकारण खरोखरीच वाईट आहे का? आणि राजकारण जर वाईट असेल, तर या क्षेत्रात हे राजकारणी का येतात ? एखाद्या विषयात
राजकारण नको म्हणताना बाकीच्या विषयात राजकारण केलेले यांना कसे चालते?
तस पाहिले तर, दैनंदिन राजकारणाचा प्रत्येक नागरिकांवर प्रत्यक्ष -
अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. आपण त्यापासून अलिप्त राहिलो तरी त्याचे परिणाम (वा
दुष्परिणाम) आपल्याला भोगावे लागतात. अश्या वेळेस नागरिक जागरूक असतील, व्यक्त होत असतील तर त्यातून राजकारणाला सन्मार्गावर
आणता येते. विचारांचे आदान-प्रदान झाल्याने आपली मते तावून सुलाखून निघतात किंवा
बदलतातसुद्धा. असं असताना 'राजकारण नको' हा सूर विसंवादी
वाटतो.
२००४ मध्ये ऑफिसच्या
कामानिमित्त सहा महिने मी अमेरिकेत मिनिआपोलीस येथे राहात होतो. मे - जूनचे दिवस
होते. जवळच्या तलावावर मी आणि माझा ऑफिसमधील सहकारी जॉगिंगला जात असू. अश्याच एका
संध्याकाळी आम्ही जॉगिंग करताना पंच्याहत्तरीचे एक आजोबा (श्री. व्हर्न राईस) भेटले.
थोड्या जुजबी गप्पा झाल्या. आम्ही भारतातून आलो आहोत समजल्यावर गप्पा अजून वाढत
गेल्या. आपल्याकडे नुकत्याच लोकसभा निवडणूक झाल्या होत्या आणि वाजपेयींचे सरकार
जाऊन मनमोहन सिंग पंतप्रधान झाले होते. सोनिया गांधींनी ऐन वेळेस आपले नाव मागे
घेतले होते. अमेरिकेतील बातम्यात याची ठळकपणे नोंद घेतली होती. राईस आजोबांना
याबद्दल बरेच कुतूहल होतं. गप्पांच्या ओघात, त्यांनी आम्हाला पुढील रविवारी संध्याकाळी त्यांच्याकडे चहाला यायचे आमंत्रण
दिले. त्या दिवसांमध्ये अमेरिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. राईस कुटुंब
डेमोक्रॅटिक मतदार होते. त्यांची बरीच मित्रमंडळी त्यादिवशी जमली होती. किंबहुना
त्यांनी मला सांगितले की स्थानिक पातळीवर असे अनेक स्वयंस्फूर्त गट सक्रिय असतात.
आठवड्यात एकदा एकत्र जमून आपल्या राजकीय पक्षाच्या विचारांचा प्रसार, वैयक्तिक पातळीवर कसा करता येईल
ते ठरवून, अनौपचारिकरित्या
प्रचारात सहभागी होतात. त्यांच्या यावषयीच्या चर्चा झाल्यावर त्यांनी माझी ओळख
करून दिली. ‘अमेरिकी राजकारण, येऊ घातलेली निवडणूक याविषयी एक भारतीय (परदेशी)
चष्म्यातून मला काय वाटतं’ असं मला
विचारल. मी सुरुवातीला थोडा साशंक होतो - आपली
स्पष्ट मते त्यांना पटतील का? ही चलबिचल त्यातील एक-दोघांच्या लक्षात
आली असावी. त्यांनी मला लगेच आश्वस्त केलं, तुम्ही तुमचे मत परखडपणे मांडा. बाहेरील जग अमेरिकेकडे कश्या नजरेने बघते हे
आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पुढे जाऊन मी माझी काही मते मांडली, भारतीयांचा आणि येथील माध्यमांचा अमेरिकेबद्दल काय
दृष्टीकोण आहे ते सांगितले. काही गैरसोयीचे मुद्दे चर्चेत आले. तरीही अतिशय
मोकळ्या वातावरणात गप्पा झाल्या.
परदेशात सामान्य जनता राजकारणात
किती सहभागी होते, मतभेद समजुतीने
हाताळले जातात हे मी यातून अनुभवले.
तसा समजूतदारपण, प्रगल्भता आपल्यात, आपल्या समाजात का नाही! राजकारणाला अस्पृश्य मानताना, राजकीय विषयांवर आपली मते मांडून, मतभेद व्यक्त करून एखाद्याचा रोष का ओढवून घ्या? एवढाच हेतू असतो, की
रोजच्या धकाधकीत, नवीन वाद कशाला हा
विचार असतो? प्रामुख्याने
सुशिक्षित मध्यमवर्ग जर असा पलायनवादी झाला तर बाकी समाजाची अवस्था तर ' मुकी बिचारी कुणी हाका' अशी होईल.
इतर अनेक बाबतीत पाश्चात्यांचे अनुकरण करणारा आपला समाज
याबाबतीत त्यांचे अनुकरण करेल का!
सुहास पानसरे
अतिशय योग्य शब्दात विचार मांडले आहेस.
ReplyDeleteधन्यवाद! 🙏🏼🙏🏼
Deleteआपले विचार न घाबरता मांडता येणे आणि दुसर्यांचे विचार ऐकून, समजून घेणे हेच लोकतंत्र! एका विषयावरचे मतभेद असले तरीही इतर बाबी सामायिक असू शकतात. मतभेद मान्य करून मैत्री टिकवता आली पाहिजे.
ReplyDeleteबरोबर आहे . धन्यवाद! 🙏🏼🙏🏼
DeleteIn one group there is a so.much polarization that i stopped from sharing anything..the views are already frozen colored so any debate is impossible..so there is no healthy or any debate.it is a ecochamber created..and I am.in another group that has its own ecochamber..so while.you say has limited meaning inlwhen someone is willing to reexamine given poaitions y
ReplyDeleteThat's common experience. Why can't we have healthy discussions even if we have diverse opinions.
Deleteयोग्य तेच सांगत आहात.
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteयात व्यक्त केलेले विचार अतिशय योग्य आहेत राजकारणाबाबत सर्वांनी आपली मते निर्भिडपणे मांडायला हरकत नाही परंतु दुर्दैवाने आपल्याकडे भारतात अशी मते व्यक्त करणे हे अडचणीचे ठरू शकते भारतातले राजकारण अमेरिके इतके सुसंस्कृत प्रगल्भ नाही नाहीतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक कुठेच निवडून आले नसते त्यामुळे सर्वसामान्य माणसे राजकारणापासून दूर राहणे पसंत करतात असे माझे मत आहे
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteमाझाही हाच अनुभव आहे की राजकारणावर चर्चा नको असते. राजकारण हे नेहमीच आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष परिणाम करते तरीही ते नको अशी मनोवृत्ती आढळते.
ReplyDelete