हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !
जून १९७६: "हॅलो ...हॅलो....अं .... कोण बोलतय. नीट ऐकू
येत नाही. परत थोड्यावेळाने फोन करा...."
जून २०२१: "हॅलो ...हॅलो....अं .... कोण बोलतय. नीट ऐकू
येत नाही. परत थोड्यावेळाने फोन करा...."
फोनच्या दोन कॉलमधे तब्बल ४५ वर्ष अंतर असूनसुद्धा भारतात फोनवर तोच संवाद ऐकू येतो (किंबहुना ऐकू येत नाही!). म्हणजे ४५ वर्षात काहीच सुधारणा किंवा बदल झाला नाही असं नाही. आज स्मार्टफोन घराघरात शिरला आहे. पण ४५ वर्षांपूर्वी, स्मार्टफोनचा मूळपुरुष - स्थितप्रज्ञासारखा एका जागी स्थिर असलेला - दणकट काळा फोन अजून घराघरात शिरला नव्हता. वीस-तीस घरांच्या वसाहतीत हा एखाद्याकडे विराजमान झालेला असायचा. सगळ्यांचे फोन आणि निरोप यावरून यायचे. कनेक्शन न मिळणे, चुकीचा नंबर लागणे असे रंग-ढंग तो दाखवायचा. सगळ्यात जास्त रुसून बसायचा तो ट्रंककॉलच्या वेळी! एक तर टेलिफोन एक्सचेन्जकडे ट्रंककॉलसाठी नोंदणी करावी लागत असे. त्यानंतर त्यांच्याकडून कधीही कॉल येईल म्हणून, ज्यांच्याकडे फोन आहे त्यांच्याकडे ताटकळत बसावे लागे. तासनतास वाट पाहिली तरी ट्रंक कॉलची लाईन मिळायची नाही. खूप वेळ झाला, कंटाळा आला म्हणून आपल्या घरी जावे तर तितक्यात ट्रंककॉल यायचा. कॉल लागला तरी अनेकदा एकमेकांचं ऐकू यायचं नाही. अश्या वेळेस राग येण्याबरोबरच हिरमुसलं होऊन जायचो. मुंबईच्या मामा - मावशीशी बोलायची उत्सुकता असे. कित्येक वेळा रात्री उशिरा दूरवरच्या शिवाजीनगर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ट्रंक कॉलची वाट पाहिल्याचं आठवत आहे.
कोणाची, कधीही वाट पाहणे त्रासदायक असते. त्याकाळी परगावाहून कोणी येत असेल तर त्यांना घ्यायला स्टेशन किंवा बस स्टॅण्डवर वाट बघताना कंटाळा यायचा. किती वेळ वाट पाहायची याचा सुमार नसायचा. हे सोडा, पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरात, आई-वडील कुठे बाहेर गेले आणि त्यांना उशीर झाला तरी वाट बघण्याशिवाय पर्याय नसायचा. तेव्हा संपर्कासाठी मोबाइल तर नव्हतेच पण फोनसुद्धा अपवादातात्मक होते. प्रवासात असताना तर संपर्क ठेवणे आजच्यासारखे सहजशक्य नव्हते. शाळेत कितीतरी वेळा बाबांची वाट बघत असताना कंटाळ्याचासुद्धा कंटाळा आलेला आठवतंय. अश्या वेळेस निरोप पोहोचवायला काही उपाय हवा असं वाटायचं.
काळ पुढे सरकत गेला. सॅम पित्रोदाने भारतात दूरसंचार क्रांती केली. फोनच अप्रूप राहिलं नाही. तो नुसताच घराघरात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. अक्षरशः गल्लीबोळात..... सगळीकडे STD-ISD-XEROX अश्या पिवळ्या-काळ्या पाट्या लिहिलेले खोकेछाप बूथ किंवा दुकानं उभी राहिली. एकेकाळी श्रीमंतांची मक्तेदारी असलेला फोन समाजाच्या सर्व वर्गात विराजमान झाला. फोनधारकांची संख्या वाढल्याने, फोनसेवेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले.
त्याकाळी मी
मुंबईला शिकायला होस्टेलवर होतो. रविवारी रात्री आम्ही सगळे वर्गमित्र आपापल्या घरी
फोन करायला जवळच्या बूथवर जायचो. रात्री १० नंतर कॉल चार्जेस २५% इतके कमी असायचे.
त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घ्यायचो. काळे
ठोकळेबाज फोन जाऊन लाल चुटुक, प्लास्टिकचे आणि बटनप्रेस फोन आले. त्यात एक रुपयाचं
नाणं टाकून बोलणं सोपं होत. होस्टेलवर काही हुशार पोरं रुपयाच्या नाण्याला दोरी बांधून
ठेवायचे. फोन झाला की नाणं काढून घ्यायचं. एक रुपया वाचला तरी शंभर रुपये कमावल्याचं
समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दिसायचं. फोन नादुरुस्त झाला तर क्वचित प्रसंगी पैसे न
टाकतासुद्धा फोन लागायचे. ही बातमी होस्टेलवर वाऱ्यासारखी पसरायची. मग लांबच्या काका-मामांनासुद्धा
फोन करून घ्यायचो.
या STD-ISD बूथची इतकी सवय झाली होती की भारतात कुठेही गेलं तरी घरी सहज संपर्क साधता यायचा. त्यापुढे जाऊन परदेशातील मित्रांशीसुद्धा संपर्क ठेवायला याचा उपयोग होत असे. पुढे १९९६ साली मी फिलिपिन्सला गेलो. त्याकाळी आपल्याकडे घराघरात इंटरनेटचा प्रसार झालेला नव्हता. साहजिकच ई-मेल, चॅट, विडिओ कॉल यांच्याशी दुरान्वयाने संबंध नव्हता. मनिला हे तेथील राजधानीच शहर. तेव्हा तेथून STD/ISD बूथवरून घरी फोन करू - असा विचार होता. मनिला येथे पोहोचल्यावर कुठेही STD-ISD बुथचे दर्शन झालं नाही. हॉटेलमधून ISD फोन करायला गेलो तर तशी सुविधा नसल्याचं कळले. ट्रंक कॉल लावून पूर्वीप्रमाणेच वाट पाहणे नशिबी आले. कालचक्रात बसून इतिहासात गेलो की काय असं मला वाटून गेलं. आपल्यापेक्षा प्रशस्त रस्ते, आधुनिक गाड्या, मोठे मॉल्स इ. इ.असूनसुद्धा दूरसंचार क्षेत्रात मात्र ते आपल्या किमान एक दशक मागे होते.
एकविसावं शतक उजाडलं आणि तंत्रज्ञानाचा जणू विस्फोटच झाला. आधी साधे मोबाइल, नंतर स्मार्टफोन यामुळे दैनंदिन जीवन आमूलाग्र बदलून गेलं. एकमेकांच्या संपर्कात काही उणीव राहिली नाही. सुरुवातीला महाग वाटणारे मोबाइल आता खिशाला कात्री न लावता त्याच ‘खिशात’ सहज सामावून गेले. घरातील सगळ्यांना एकमेकांशी सतत आणि सहज संपर्क साधण शक्य झाल. ऑफिसच्या कामासाठी मात्र २४ तास उपलब्ध राहण्याची वेगळीच डोकेदुखीसुद्धा यामुळे मागे लागली आहे.
जसा मोबाईलचा प्रसार वाढला, तसे मोबाईल वापरणे स्वस्त झाले. त्यामुळे त्याचा वापर इतका वाढला की त्याच जाळं अपुरं पडू लागलं आहे. एक वर्तुळ पूर्ण होऊन पूर्वीप्रमाणेच कनेक्शन न मिळणे, फोन संभाषण चालू असताना मधेच बंद पडणे असे प्रकार सुरु झाले आहेत. काळाबरोबर आपण पुढे चाललो आहोत की चकवा लागून फिरून पहिल्याच ठिकाणी आलोय अशी शंका येते.
दळणवळण आणि संपर्क क्षेत्रात क्रांती झाली आणि भूमितीय अंतर आभासी रीतीने कमी झालं. म्हणजे मुलं - नातवंड परदेशात असली तरी त्यांच्याशी रोज गप्पा शक्य झाल्या आहेत. व्हिडीओ कॉलद्वारे प्रत्यक्ष भेटायची दुधाची तहान फुल क्रीम नाही पण स्किम्ड मिल्क वर भागू शकते.
एकीकडे मोबाईलवर, व्हाट्सएप ग्रुपवर गप्पा, अंगठे उंचावून दाद देणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे चालू असते. पण त्यात औपचारिकता येऊन, प्रत्यक्ष शुभेच्छा देणे राहून जाते. मग आपल्यातील आभासी अंतर कमी झाल्याने भावनिक अंतर कमी झालं …… की वाढलं?
एकदा सणाच्या दिवशी, आम्ही एकत्र जमलो होतो. पूजा झाली होती आणि सगळे निवांत होतो. दिवाणखान्यात आपापल्या मोबाइलमध्ये सगळे दंग होते. थोड्या वेळाने बाबा कडाडले - "सगळ्यांनी मोबाईल बाजूला ठेवा आणि एकमेकांशी गप्पा मारा". एकीकडे जगातल्या कानाकोपर्यातील व्यक्तींशी आभासी संवाद होत असताना समोर असलेल्या आप्तस्वकीयांशी प्रत्यक्ष संवाद हरवला आहे का?
शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत - 'विज्ञान शाप की वरदान' असा हमखास विषय असे. आपण विज्ञानाचा जसा उपयोग करू त्यावर तो शाप की वरदान ठरते. तसेच सध्याच्या युगात संपर्क क्रांतीमुळे आपली प्रगती झाली आहे की आपण पुन्हा मागील वळणावर आलो आहोत? गम्मत बघा - तेच उत्तर इथे चपखल आहे.
सुहास पानसरे
नेहमीप्रमाणे छान विचार मांडले आहेस. माझ्या मते कुठल्याही प्रकारची प्रगती जर योग्य नियोजनाविना झाली तर ती आपल्याला चक्रात फिरवते. दूरदृष्टी ठेवून केलेली प्रगती मात्र सदैव पुढे नेते. दूरसंचार क्रांती त्याचंच एक उदाहरण.
ReplyDeleteधन्यवाद मिलिंद!
Deleteअतिशय सुंदर. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान.
ReplyDeleteअतिशय सुंदर. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. छान.
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteDown the memory lane . . . .
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteखरेच छान विचार आहेत. पूर्वी फोन कमी होते म्हणून प्राँब्लेम होता आता गरजेपेक्षा अति झाले म्हणून प्राँब्लेम आहे.
ReplyDeleteधन्यवाद मिलिंद!
Deleteखूपच छान.
ReplyDeleteथोडे नॉस्टॅल्जिक परंतु विचार करायलाही लावणारे
छान मांडली आहेस आपण सर्वांची व्यथा
ReplyDeleteसंजय अग्रवाल
धन्यवाद संजय !
DeleteSuhas you always used to write properly and express your experience and views properly. Keep writing we love it 🌹🌹🌹👌
ReplyDeleteThanks Sarjerao for your appreciation!
Deleteकोरोना महा मारीच्या काळात जेव्हा की सोशल डिस्टंसिंग पाळायचआहे तेव्हा तर फोन म्हणजे वरदानच आहे कारण आयसोलेशन मध्ये माणसाला स्मार्टफोन हाच सखा सोबती आणि मार्गदर्शक अगदी मितवा म्हटलं तरी सुद्धा चालेल असाच आहे . Video calling मुळे याची देही याची डोळा समोरच्या व्यक्ती ची ख्यालीखुशाली समजते पाहायला मिळते आणि तेही चकटफू... पूर्वी ट्रंक कॉल बिल भरतांना नाकी न ऊ यायचे त्या पार्श्वभूमीवर
ReplyDeleteहा सुखद बदल झालेला आहे सध्या तर काय शाळा कॉलेज,ऑनलाईन चाललेले आहेआणि लॅपटॉपच्या किमतीपेक्षा पालकांना मुलांना मोबाईल फोन घेऊन दिलेल्या परवडतो आहे आता हेच पहा ना मोबाईलची बॅटरी जेव्हा अगदी कमी उरते तेव्हा आपल्याला स्वतःलाच व्हेंटिलेटरवर असल्यासारखे वाटते इतकी फोन ही जीवनावश्यक वस्तू झालेली आहे हे सगळे फायदे तर आहेतच परंतु कुठेही अतिपरिचयात अवज्ञा होतेच त्याच प्रमाणे
कामाव्यतिरिक्त ही लोक मनोरंजनासाठी मोबाईल मध्ये डोकं घालून बसतात आणि समोर एखादी व्यक्ती आहे तिलाही विसरून जाऊन या व्हर्चुअल जगामध्ये ते रमतात हे मात्र नक्की चुकीच आहे.
मानवाला देवाने जे सारासार विचार करण्याचं आणि त्याप्रमाणे कृती करण्याचं वरदान दिलेल आहे त्याचा आपण योग्य तो वापर करावा म्हणजे स्मार्टफोन हा शाप न ठरता वरदानच ठरेल .
सुहास तू खूपच छान शब्दात लिहिलेल आहेस लिहीत रहा ....
This comment has been removed by the author.
ReplyDeleteखूप छान विचार मांडलेत सुहासजी.
ReplyDeleteतंत्रज्ञान क्रांतीमुळे सहज सुलभ झालेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असो, औद्योगिकीकरणाच्या वेगामुळे आलेली उत्पादनांची मुबलकता असो किंवा पाणी, वृक्ष, खनिज तेल अशी नैसर्गिक साधन संपत्ती असो, केवळ आर्थिक मूल्याच्या निकषावर तोलून आणि अतिवापरा मुळे होणारे दुष्परिणाम दुर्लक्षित करून उपलब्ध संसाधनांचा अनिर्बंध वापर ही सार्वत्रिक असणारी अविचारी मानवी वृत्तीच मानवाच्या मुळावर उठणारी ठरेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रसादराव धन्यवाद! सारासार विवेक ठेवला पाहिजे.
Deleteसुंदरच लिहिलेस सुहास. जुन्या आठवणी जागृत झाल्या. 10 नंतर केलेले फोन आठवले. आता मोबाईल नं आपलं सगळंच जग अगदी व्यापून टाकलंय इतकं की शेजारी बसलेल्याला ही आपण whatsapp मेसेज करतो कित्येकदा. तेही तू मांडलं आहेस. अजून लिही म्हणजे आम्हाला वाचायला मिळेल...
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteSuperb write-up. Keep writing
ReplyDeleteThanks!
DeleteEnjoyed the journey from my childhood to the present. The technological change is phenomenal. I wonder if the present generation has any curiosity to get to know such developments in their parent’s lifetime. Keep writing, look forward to the next one.
ReplyDeleteYou said it!
DeleteFarach Sunder.Apratim.You took us to those times of sweet old memories.Suhas Please keep writing & Sharing with us.Awesome as always.Best Wishes
ReplyDeleteThanks Shrikant!
Deleteतुझ्या मनस्वी लेखनाला कुठल्याही विषयाचे बंधन नाहीये हे फार चांगलं आहे.. इतरांच्या फक्त मनात असणारे विचार तू लिहितोस तेव्हा वेगळ्या उंचीवर पोहोचलेले असतात.. काळ बदलतोय तसे आपणही बदलतोय.. आणि सहजपणे 'दुनिया मुठ्ठी में' आणणारा फोन सुध्दा.. नेहमीसारखे छान लेखन केलं आहेस.. 👌👍
ReplyDeleteधन्यवाद !
Deleteछान लिहिले आहेस सुहास.
ReplyDeleteधन्यवाद शिरीष!
DeleteVery well written Suhas - as always!
ReplyDeleteProgress in technology has made life easier - apparently. But the point you have highlighted is cause of worry - the world has become smaller but distance between individuals has increased. Correcting that is the challenge.
Milind Ranade
Thanks Milind. Agree with you
DeleteJust got to read. Wonderful blog. Touches one's heart. Nicely articulated too. 👍
ReplyDelete