छंदोपनिषद !
“घेई छंद मकरंद .....प्रिय हा मिलिंद ...मधुसेवनानंद स्वच्छंद ......!”
पंडित वसंतरावांचे स्वर कानी पडत होते. ‘छंद’ या शब्दांनी माझं लक्ष वेधून घेतलं. नकळत भूतकाळात जाऊन आपण केलेले विविध छंद आठवले. काही बालिश तर काही स्वानंद देणारे....पण काळाच्या ओघात अलगदपणे निसटून गेलेले. १९७७-८०च्या आसपासचा तो काळ. सुट्टीतल्या छंदवर्गांचं फॅड अजून आलं नव्हतं. पण अनेक छंद आमच्या घरात घर करून असत.
माझ्या आठवणीतला माझा पहिला छंद म्हणजे पक्ष्यांची पिसे जमविण्याचा. रस्त्यात मिळण्याऱ्या पक्ष्यांच्या पिसांना फारसा भाव नव्हता. चतुःशृंगीच्या जत्रेत विविध रंगांच्या पिसांच्या टोप्या मिळायच्या. अशी टोपी म्हणजे पिसांचे घबाडचं असे. पण सगळ्यात उठून दिसणारी पिसं मिळायची ती पक्षी संग्रहालयात. लोणावळ्याला राजमाची पॉइंटवर एक पक्षी संग्रहालय होतं. तेथील रंगीबेरंगी पक्ष्यांची पिसं मी गोळा केली होती. त्यातलंच एक सप्तरंगी पीस मला फार आवडलं होतं. शाळेत एकदा ते मित्रांना दाखवायला नेलं. कर्णिक नावाच्या मित्राने ते त्याच्या घरी नेलं. आमची परीक्षा झाली आणि मग मला त्याची आठवण आली. त्यानेसुद्धा निकालाच्या दिवशी ते आणून द्यायच कबुल केलं. पण निकालाच्या दिवशी आमची - म्हणजे माझी आणि कर्णिकची आणि त्यामुळे माझी आणि त्या पिसाची - चुकामुक झाली… ती कायमचीच. कारण मी ती शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेलो. नंतर अनेक दिवस त्या पिसाच्या आठवणीने माझ्या मनाची पिसं पिसं निघाली.
पाचवीनंतर आपण मोठे झालोय असं वाटू लागलं आणि त्यामुळे पिसं जमवण्यासारखे छंद मागे पडले. वर्गातील काहीजण काड्यापेट्यांवरील चित्र जमवू लागले. आज सगळीकडे SHIP आणि POWER ब्रॅण्डच्या काड्यापेट्या आहेत, तश्या त्यावेळेस 'टिक्का' ब्रॅण्डच्या काड्यापेट्या पुण्यात मिळत. त्यावरील किल्वर, इस्पिक, चौकट आणि बदामची चित्रे मला आठवतात. मुंबईला आजोळी गेलो की तिकडे WIMCO च्या काड्यापेट्या मिळायच्या. सोलापूर, पंढरपूर इकडे माझ्या आत्त्यांकडे गेल्यावर पूर्ण नवीन काड्यापेट्या असायच्या. अर्थात मला यामध्ये फार रस नव्हता. अगदी अलीकडे मी एका मित्राकडे गेलो असताना त्यांच्या कॉफीटेबलच्या काचेखाली कित्येक काड्यापेट्यांची पाकिटं दिसली. आपण हॉटेलमध्ये उतरतो त्या रूममध्ये काड्यापेटीच पाकीट असतं. ज्या ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला तेथील काड्यापेटीची पाकिटं त्यांनी souvenir म्हणून गोळा केली होती.
पुरातन काळातील तसच विविध देशांची नाणी जमवायचा छंद अनेकांना असतो. पण हा छंद मला त्यावेळी फारसा भावाला नसला तरी पुढे जाऊन ज्या ज्या देशांना भेटी दिल्या, तेथील प्रातिनिधिक नाणी आणि नोटा आठवण म्हणून ठेवल्या आहेत. २००४ साली अमेरिकेला गेलो होतो. तेव्हा त्यातील २५ सेंटच्या नाण्यांच वेगळेपण मला जाणवलं. या नाण्याच्या एका बाजूवर अमेरिकेतील एकेका राज्याचा शिक्का किंवा त्या राज्याच्या संदर्भातील चित्र असतं. मग असं नाणं मिळालं की मी पारखून घेऊ लागलो. आजही माझ्याकडे २५ सेंटची राज्यविशेष दर्शवणारी अशी ३०-३२ नाणी आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला भारतात निश्चलनीकरण (Demonetization) झाल्यामुळे काही जणांकडे (सक्तीने आणि अचानक) पाचशे-हजाराच्या नोटांचा संग्रह तयार झाला असेल... पण असा संग्रह कौतुकाने दाखवायची सुद्धा चोरी आहे!
एकदा नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनाला जायचा योग आला. तेथील स्टॉलवर एका संग्राहकाशी गप्पा रंगल्या होत्या. या छंदामध्ये ते आकंठ बुडून गेले होते. स्वातंत्र्यपूर्व भारतातील नाणी आणि नोटा, जगाच्या कानाकोपऱ्यातील देशातील नोटांचा अफाट संग्रह पाहून मी चाट पडलो. आपला जन्मदिनांक (१ सप्टेंबर २००१) सांगितला की त्या क्रमांकाची (०१०९०१) दहा रुपयाची नोट ते लगेच काढून देत होते. वीस-बावीस वर्षांपूर्वी मी म्यानमारला गेलो होतो. तेथून परतताना तेथील २ च्याटची नोट माझ्याकडे उरली होती. जीर्ण शीर्ण झालेली नोट पाकिटात तशीच पडून होती. त्यांना ती नोट दिल्यावर त्यांचा चाट पडलेला चेहेरा अजून माझ्या डोळ्यासमोर येतो.
पाचवीनंतर केलेला सगळ्यात मोठा छंद म्हणजे पोस्टाची तिकिटे जमवणे. मागे वळून पाहताना छांदिष्ट म्हणजे काय ते मला या छंदावरून कळतं. कुठूनतरी पाच पन्नास तिकिटं मिळवून याची सुरुवात झाली. आपल्याकडील वैशिष्ट्यपूर्ण तिकिटांमुळे आपल्या संग्रहाचा भाव वाढायचा. महात्मा गांधी, पंडित नेहरू, नॅट विमान, भारताचा नकाशा, तंबोरा आणि सिंहमुद्रा असलेली शासकीय तिकिटं खंडोगणती मिळायची. पण काही दुर्मिळ आणि वेगळ्या तिकिटांच्या बदल्यात इतरांकडून आपल्याकडे नसलेले दुर्मिळ तिकीट मिळवणे अशी योजना असायची. पोस्ट खात्याने एखाद नवीन तिकिटं आणलं की पुण्यातील सर्वात मोठं पोस्ट ऑफिस - GPO मध्ये जाऊन ते नवं कोरं तिकीट आणणे हा कार्यक्रम पक्का असायचा.
परदेशी तिकिटं मिळाली तर लॉटरी लागल्याचा आनंद व्हायचा. कोणीतरी ओळखीचं परदेशी असेल तर त्यांच्याशी पत्रव्यवहार करून अशी तिकिटं मिळायची. पण या सगळ्यांवर मर्यादा होत्या. अश्या प्रकारे किती तिकिटं मिळणार! एक सोप्पा पण खर्चिक मार्ग होता - डेक्कन जिमखान्यावरील हॉंगकॉंग लेनमध्ये स्त्री प्रसाधनांच्या दुकानांच्या भाऊगर्दीत (बहीणगर्दीत म्हणणे योग्य ठरेल), एक दुकान होतं. तिथे विविध देशांच्या तिकिटांची पाकिटं मिळायची. मग वाढदिवसाची भेट, आत्या-मावशी यांच्याकडून हक्काची भेट म्हणून कधीतरी असं पाकीट मिळायचं. त्यात कधीही न पाहिलेले स्टॅम्प्स मिळत. तिकिटांची संपत्ती एका दमात पन्नास तिकिटांनी वाढत असे. मित्रांमध्ये भाव वधारायचा. पण अशी तिकिटं विकत घेण्यात निर्भेळ आनंद नसायचा. लॉटरीत मिळालेले पैसे आणि स्वकमाईचे पैसे यात जो फरक तो हाच!
मग इतर हिकमती करून अनेक ठिकाणं शोधून काढली. मी औंधमध्ये राहत असल्याने, जवळच्या स्पायसर कॉलेजमध्ये अनेक परदेशी विद्यार्थी दिसत. त्यांच्याशी ओळख करून घेऊन त्यांच्याकडून स्टॅम्प्स जमवल्याचं मला आठवतं. एकदा कोणीतरी सांगितलं की बालभारतीच्या जवळ गोखले इन्स्टिटयूटच्या आवारात विद्यार्थी वसतिगृह आहे. तिथे काही परदेशी विद्यार्थी राहतात. त्याच्याबरोबर एका रविवारी सकाळी तिकडे मोहरा वळवला. अश्या उचापत्या करून मिळवलेल्या तिकिटांबद्दल अधिक आत्मीयता वाटे. एखादा अपवाद वगळता बहुतेक मोहिमा फत्ते होत. एकदा आमच्या गवळ्यानी सांगितलं की आमच्या घराजवळ (डॉक्टरेट करणारा) एक इराकी विद्यार्थी राहतो आणि त्याच्याकडे हा दूध द्यायला जातो. हा गवळी आमच्या घरातील सदस्य असल्यासारखा होता. त्याच्यामागे लागून एकदा या इराकी माणसाची ओळख करून घेतली. हे गृहस्थ पन्नाशीतील होते. इराकमधील घडामोडींना वैतागून इकडे आले होते. पण नाजूक राजकीय विषय वगळता आमची चांगली गट्टी जमली. मला त्यांच्याकडून विविध देशांच्या तिकिटांची चांगली कमाई झाली.
या तिकिटांच्या छंदामुळे अनेक देशांची तोंडओळख तर झालीच पण त्याचबरोबर या देशांच्या स्थानिक नावांची ओळख झाली. जसं जगात 'इंडिया' म्हणत असले तरी आपण 'भारत' म्हणतो. जपान-निप्पोन हे माहित होतं. पण स्पेनला Espana, स्वीडनला Sverige, स्वित्झरलँडला Helvetia, मलेशियाला मलाया म्हणतात हे समजलं. इंग्लंडच्या तिकिटांवर त्या देशाचं नावच नसायचं. साहेबाचा तोरा पोस्टाच्या तिकिटावर शिक्का मारल्यासारखा स्पष्ट दिसायचा म्हणा ना! रशियाच्या तिकिटांवर USSR च्या ऐवजी CCCP का लिहितात ते शेवटपर्यंत समजलं नाही. अनेक दिवस Magyar Posta चे स्टॅम्प म्हणजे कुठल्या देशाचे? हे कोडं सुटत नव्हतं. कोणाकडून तरी ते हंगेरीचे आहेत कळलं, तेव्हा स्वतःच तिकडे जाऊन आल्याचा आनंद झाला होता.
सुरुवातीला जमवलेली तिकिटे एका पाकिटात मावत. पण जसजशी तिकिटांची संख्या वाढली, तसा काहीतरी उपाय करणं आवश्यक झालं. त्याच सुमारास, बाबांच्या एका मित्राकडे गेलो होतो. त्यांची पत्नी डच होती. त्यांच्या मुलीनी – मोनीशानी - माझा स्टॅम्प्सचा छंद ऐकून तिच्याकडील स्टॅम्प्सचा संग्रह दाखविला....तो पाहून लहान मूल खेळण्यांच्या दुकानात हरवून जाईल तशी माझी अवस्था झाली. शेकडो नव्हे तर हजारो तिकिटांचा संग्रह पाहून मी पार हरखून गेलो होतो. हे सर्व स्टॅम्प्स देशानुसार, त्यावरील चित्रांच्या, विषयांच्या वर्गवारीनुसार लावून ठेवले होते. त्यासाठी विशेष संग्रहपुस्तिका होती (तिला अशी पुस्तिका अर्थातच नेदरलँड मध्ये मिळाली असणार). जाड पानांच्या या पुस्तिकेत, प्रत्येक पानावर बटर पेपरच्या पट्ट्या चिकटवल्या होत्या. त्यामध्ये स्टॅम्प अडकवायला खाचा तयार केल्या होत्या. यामुळे असे स्टॅम्प्स संग्रहित करणं खूप सोपं झालं होतं. अशी पुस्तिका जरी मिळाली नाही, तरी जुन्या वह्या काढून, त्यातील पानांवर बटर पेपरच्या पट्ट्या चिकटवून मी त्याची देशी आवृत्ती तयार केली. माझ्याकडे अश्या कित्येक वह्या झाल्या होत्या.
मोनिशाच्या बोलण्यातून मला खूप माहिती मिळाली. अमेरिका आणि युरोप येथील देशांच्या पोस्टाच्या तिकिटात एकसुरीपणा असतो. इंग्लंडच्या तिकिटांवर राणीचा फोटो आणि त्याच्या किंमतीनुसार ठराविक रंग हीच काय ती विविधता. त्याउलट भारतीय पोस्टाची तिकिटे ही विविध विषयांनी नटलेली आहेत हे लक्षात आलं. भारतातील प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो, निसर्गातील फळे, फुले आणि प्राणी, भारतभरातील ऐतिहासिक वास्तू, इतकेच काय पण रेल्वेची वेगवेगळी इंजिने यांचे सुद्धा स्टॅम्प भारतीय पोस्टखात्याने काढले आहेत. म्हणून जागतिक स्टॅम्प विश्वात भारतीय स्टॅम्प्सना चांगला भाव असतो. त्याकाळी या क्षेत्रात तरी भारताचा ठसा (स्टॅम्प) उमटला आहे हे कळल्यावर कॉलर ताठ झाली होती.
कॉलेजमध्ये गेल्यावर अभ्यासाकडे लक्ष देताना सगळे छंद मागे पडले. सुरुवातीला मला माझे काका, मामा किंवा आते - मामे - मावस भावांकडून तिकिटं मिळाली. त्याच परंपरेनुसार मीही माझा संग्रह धाकटी भावंडं, भाचे-पुतणे कोणालातरी देऊन टाकला.
आता इंटरनेटमुळे पत्रलेखन जवळ-जवळ कालबाह्य झालं आहे. पोस्टाची तिकिटं जमवायची म्हटली तरी त्यांचा वापरचं इतका कमी झालाय की पूर्वीप्रमाणे तिकिटं कुठून आणि कशी मिळवायची? त्यापेक्षा हाँगकाँग लेनमधील दुकानात अजून मिळत असतील तर तेथून विकत आणणे सोपं आणि सहज आहे.
अधून मधून वर्तमानपत्रात वाचायला मिळतं की पोस्टखात्याने नवीन स्टॅम्प काढला आहे. अश्यावेळेस माझ्या छंदाची आठवण येते. ब्रिटिश जसं त्यांचा भूतकाळ जतन करतात (अगदी कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा) तसं आपण हा अनमोल संग्रह जतन का केला नाही अशी खंत वाटते. शाळेत असताना ठराविक विषयांवर निबंध लिहायला सांगत. "भूतकाळात जायला मिळाले तर" ..... असा एक हुकुमी विषय निबंधासाठी असे.
जर खरच मला भूतकाळात जाता आलं तर वर्तमानात परत येताना मी माझ्या स्टॅम्प संग्रहाच्या वह्या नक्की घेऊन येईन.
सुहास पानसरे
GREAT
ReplyDeleteThanks a lot!
Deleteफारच सुंदर भाषाशैली. मस्तं भूतकाळात नेलस सुहास. आठवणी जाग्या केल्यास
ReplyDeleteधन्यवाद! 🙏🏼🙏🏼
DeleteGood to read sonething positive and nostalgic in this depressive time 👍
ReplyDeleteVery nice. It took me in the past as well.
ReplyDeleteछान लिहिल आहे, पण "सुट्टीतल्या छंदवर्गांचं फॅड अजून आलं नव्हतं" हे वाक्य, विशेष करून छंदवर्गांना "फॅड" म्हणणं, हे मात्र जरा खटकल. प्रत्येक पिढीची आपापली संस्कृती असते, आणि ती बदलत असते. तुमच्या मागच्या पिढीतल्या कोणी त्यांच्या छंदा बाबत असाच लेख लिहिला असता तर त्याने "स्टॅम्प जमा करण्याचं फॅड अजून आल नव्हत" अस लिहिलं असत. त्याने तसे लिहिल्याने स्टॅम्प जमा करणे हे फॅड होत नाही. कोणत्याही पिढीने पुढच्या पिढीच्या संस्कृती वर टपली मारू नये, कारण प्रत्येक पिढी ही कोणत्या तरी पिढी करता "पुढची" पिढी असते. .
ReplyDeleteचेतन पंडित
"प्रत्येक पिढीची आपापली संस्कृती असते" - या ब्लॉगची सुरुवात अश्याच वाक्याने करणार होतो. पिढ्यांमधील बदलते संदर्भ तुम्ही म्हणता तसे बरोबर आहेत. पण तसं पाहिलं तर फॅड हे उणेपणाच विशेषण असं का वाटतं ? त्या त्या काळातील 'In Thing' म्हणजे एक प्रकारचं फॅड असतं .
Deleteपण तुमच्या अभिप्रायाचं स्वागत आहे. धन्यवाद!
नेहमीप्रमाणेच छान केले आहेस लेखन.. तुझ्या मनस्वी छंदांचे तरंग पोहोचले.. वय वाढले तरी असे गतआठवणीतले छंद निश्चितच आनंद देऊन जातात.. असाच लिहिता हो.. व्यक्त हो.. शुभेच्छा..!👍
ReplyDeleteधन्यवाद !
DeleteWow!!! Great twist to each paragraph! Thoroughly enjoyed reading. Ideas and narrative both are very vivid and engaging 😀
ReplyDelete🙏🏼🙏🏼
Deleteफारच छान सुहास. मला स्वतःला काड्यापेटीचे छाप जमवायचा छंद होता. त्यामुळे शब्दशः ‘खालमुंडी पाताळ धुंडी’ अशी माझी अवस्था असायची. आपल्या शाळेची कर्नाटकात ट्रिप गेली होती. त्या दहा बारा दिवसात प्रचंड खजिना सापडला होता.
ReplyDeleteA lovely article Suhas. Not only because its written in an excellent way, but also because you literally took me down the memory lane.��Collecting coins, match boxes, stamps - oh yes ��.
DeleteOne thing I learnt that tje hobby of collecting stamps is called philately! �� Yes our Posts came up with stamps that covered diverse subjects. I recall that some time in 80s may be - Indian Posts had released a stamp in honour of Pasha Kemal Attaturk, the iconic Turkish President. And there had been one for Dr. Martin Luther King.
Plus we have commemorative stamps for our Armed Forces - many Regiments and Battalions have been thus honoured.
Oh oh I am really back in those days.
Thanks for the write up.
Milind Ranade
मिलिंद द्वयी - तुमच्या अभिप्तयाबद्दल धन्यवाद. मला कधी कधी वाटतं की ते स्टॅम्प्स जपून ठेवायला हवे होते... पण काही गोष्टी आपल्या हातातून सुटतात.... अलगदपणे...
DeleteEntertaining and interesting reading about the hobbies which were very rewarding and I too can associate with it. Such hobbies are a reflection of creative mind and hence reflect your personality. It is important to list these things for the sake of recording the past as the future generation may see postal stamps and match boxes only in a museum. The change now is so rapid, we stopped writing and started typing, we stopped communicating but started chatting, and we no more observe we only view. Please keep it up, I look forward reading more. Ranjit
ReplyDeleteAgree with you. I have treasure of letters written to my friends when they went there for their masters. These are fond memories
DeleteA super read again. Your command on Marathi language is excellent. I would have loved to write back in Marathi but it’s better I express in English only 😜.
ReplyDeleteI agree with many who commented that your article takes us down the memory lane as all of us can correlate what you expressed. I too have tried my hands with the hobby of collecting leaves 🍁. And I used to also collect phrases and idioms from newspapers. Also remember collecting flags and matchboxes . I don’t think today’s kids will find it interesting but every child has some special hobby for sure even today.
It was a great feeling to see a fried leaf that was kept in the text books for more than a year. I remember using these leaves for my drawings as well although was never a good painter 😬
Thanks for taking us to a wonderful journey back to our childhood days 🥰🥰
Please keep writing 🌹
Please read “ dried leaf “ instead of “fried leaf” 🙈
DeleteThanks Rajesh for kind words. Language is only means of conveying our feelings. So perfectly fine for English comments.
DeleteDried leaves must be very difficult hobby - I mean preserving those leaves.
सुंदर
ReplyDeleteधन्यवाद ! 🙏🏼🙏🏼
Deleteसुहास उत्तम लिहले आहेस... वाचत असतानाच मी पण बालपणात हरवून गेलो आणि आपण काय काय उद्योग केलेत ते डोळ्यासमोर येऊन गेले.... आम्ही खेडेगावत असल्यामुळे आणि इतर जगाशी काय शहराशी सुध्दा फार क्वचित संबंध यायचा.... मी कॉलेजला असताना होस्टेलच्या खिडकीच्या बार मध्ये विविध साबणांची खोकी अडकवली होती आणि ते इतकं भन्नाट दिसायचं की माझ्या रूमची ती एक वेगळीच ओळख झाली होती... कोणी नवीन मित्र येणार असेल तर त्याला खूण म्हणून असेच सांगायचे, दुसऱ्या मजल्यावरील खिडक्या बघा आणि ज्या खिडकीत साबणांची खोकी/रॅपर्स लावलेली दिसतील तिथे या.... तुझ्या या ब्लॉग मुळे कॉलेज हॉस्टेल रुम वर पोहोचलो आणि अर्थातच ते बॅचलर दिवस आणि हॉस्टेल धमाल डोळ्यासमोर आली.... धन्यवाद 🙏
ReplyDeleteधन्यवाद ! 🙏🏼🙏🏼
Deleteप्रत्येकाचे असे नानाविध छंद ऐकून आज मजा वाटते.