बंद कुपीतील दारफळ

मराठीतील महाकवी "गदिमा' यांनी  "खेड्यामधले घर कौलारू" या गीतात खेड्याचं मोहक वर्णन केलं आहे. माझ्यासारख्या संपूर्ण शहरी माणसाच्या आयुष्यात आजपर्यंत खऱ्या अर्थाने एकच खेडं आलं आणि ते (किमान पक्षी त्यावेळेस) असं मनमोहक नक्कीच नव्हतं. गावाला वेस होती, पण गावात शिरणाऱ्या रस्त्याला दोन बाजूंना दोन चौकोनी खडक मांडले होते, तेच काय ती वेस आल्याची वर्दी द्यायचे. एकच एक रस्ता होता खरा पण त्याकाळी (७०-८० च्या दशकात) तो इतका कच्चा होता की धुळीने तो सदैव माखलेला असायचा. पार आणि चावडी असली तरी ती बहुतेकदा ओसाड असायची. पोरांनी पोरींवर लाईन मारावी इतके तिघेही (पोरं, पोरी आणि खेडं) पुढारलेले नव्हते. नदी होती, पण हा भाग (की अभागी भाग) कायम दुष्काळाच्या गर्तेत असल्याने त्याला पाणी आलेलं मला तरी आठवत नाही. त्यापुढे जाऊन विजेचा  लपंडाव पाचवीला पुजलेला. त्यामुळे अंधार झाला की आहे तिथे स्वस्थ बसायची शिक्षा असायची. अशा खेड्यात मोहक आणि रोमॅंटिक ते काय वाटणार ? पण चाळीस वर्षे मागे वळून  पाहताना त्यातील मजा काळाच्या ओघात कशी हरवून गेली याची जाणीव हुरहूर लावून जाते.

दारफळ - महाराष्ट्रातील वैराण अशा सोलापूर जिल्ह्यातील त्याहून वैराण असणाऱ्या माढा तालुक्यातील एक आडवाटेच खेडं. लोकसंख्या जेमतेम दोन हजार !

साठीच्या दशकात या खेड्यात उराशी एक ध्येय आणि स्वप्न घेऊन नूलकर पती-पत्नी हे नवविवाहित जोडपं या खेड्यात आलं. सौ. वसुंधरा नूलकर (आमची मालूआत्या आणि संपूर्ण  खेड्याच्या आदरणीय “बाई”) आणि यजमान श्री. शरद नूलकर (आमचे काका आणि खेड्यातील सर्वांचे “सर”) यांनी "नवभारत विद्यालय" सुरु केले. या दोघांनाही आदर्श शिक्षक आणि शाळेला राज्य सरकारचे आदर्श शाळेचे अनेक पुरस्कार मिळाले. एक पथदर्शी शाळा असा तिचा लौकिक होता. या दोघांना साथ मिळाली ती सरपंच तुकाराम शिंदे यांची.  समाजवादी विचार हा सर आणि सरपंच या दोघांमंधील समान दुवा. त्या जोरावर त्यांनी या खेड्यात त्याकाळी अनेक समाज सुधारक उपक्रम राबवले. पुरोगामी विचारांना सत्तेची जोड - हा संगम काय चमत्कार करू शकतो याच दारफळ हे ठळक उदाहरण आहे. 

मालूआत्या कडे जायचं म्हणजे हुरड्याला - हे समीकरण त्यावेळी घट्ट होतं. 'एसटी'चा पर्याय कामाचा नव्हता. एक तर दारफळला संध्याकाळी माढ्याहून एकच 'एसटी' जायची. पुण्याहून माढ्याला 'एसटी'ने जाणे काही सोपं नव्हतं. सर्वात चांगला पर्याय म्हणजे रात्रीची पॅसेंजर घेऊन पहाटे माढा गाठणे आणि तेथून बैलगाडीनी दारफळची वाट धरायची. हा प्रवास या दोन वाक्यात संपणारा नव्हता. फोन - मोबाइल नसलेल्या दिवसात, पत्रापत्री करून प्रवासाच्या तारखा निश्चित करणे. त्यानुसार रेल्वेची तिकिटे आरक्षित करणे हा पहिला सोपस्कार ! प्रत्यक्ष रेल्वेचा प्रवास - रात्रीचा म्हणून जितका मजेचा तितकाच माझ्यासाठी काळजीचा आणि गूढरम्य असायचा.  मुळात ती पॅसेंजर असल्याने आणि त्यातसुद्धा सोलापूरकडची - म्हणजे गाडी प्रवासातच नाही तर एकूणच सायडिंगला टाकलेली ! दिवे चालू असले तर पंखे चालू नसतील आणि  हे दोन्ही असेल तर चार्ट नसेल आणि अश्या अनेक अडचणी. मुंबईला जाताना डेक्कन क्वीनच्या गुलगुलीत प्रवासाची झालेली सवय, त्यापुढे  पॅसेंजरचा अवतार पाहून अर्ध अवसान तिथेच गळून जायचं. आणि बाकी अर्ध अवसान गाडीतील गर्दी पाहून ! गाडी प्लॅटफॉर्म वर आली की  कोण धांदल असायची.  सर्व डब्यांमध्ये चढायला तुंबळ युद्ध व्हायचे. काही वेळाने आपापल्या जागांवर स्थानापन्न झालो की गाडीत चढताना ज्यांच्याशी हुज्जत घातली तेच आपले शेजारी पाहून मला तर कानकोंड्यासारखे व्हायचे. पण लवकरच माझे बाबा आणि शेजारी गृहस्थांचे प्रेमळ संभाषण सुरु व्हायचे. पुण्यातील नाही तर सोलापूरकडील काही तरी ओळख निघायची.  त्यांची शस्त्रसंधी झालेली पाहून माझी एक भीती कमी व्हायची. गाडी हलली की जेवणाचे डबे उघडायचे.  रेल्वेतील रात्रीचे जेवण म्हटले की माझ्या डोळ्यासमोर - पोळी, कांदा-बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि दहीभात हा एकच एक मेनू येतो. ही कल्पना इतकी घट्ट होती की पुढे कित्येक वर्षांनी ऑफिसच्या कामानिमित्त राजधानीने दिल्लीला जाताना त्यात मिळणारे जेवण याहून वेगळे असेल असं  वाटलंच नव्हतं.  जेवण होईपर्यंत गाडीने उरुळी किंवा यवत  गाठलेले असायचे. एव्हाना बऱ्यापैकी रात्र झालेली असायची आणि संपूर्ण प्लॅटफॉर्म वर मोजकेच प्रवासी आणि ते आपला डबा शोधत लगबगीने जाताना दिसत. अजून झोपेची वेळ झालेली नसल्याने खिडकीत कोणी बसायचे यावरून भावंडात प्रेमरूप संवाद झडत असत. त्याकाळी कोळश्याचं इंजिन असल्याने त्यातून उडणाऱ्या ठिणग्या काजव्यान्ची आठवण करून द्यायच्या.

झोपेची वेळ झाली की माझ्या पोटात दोन गोळे यायचे - पहिला यासाठी की आपल्याला झोप लागली आणि आपलं सामान कोणी चोरून नेलं तर ? पण असं काही होत नाही याची बाबांना मात्र खात्री असायची. दुसरा प्रश्न म्हणजे माढा स्टेशन अपरात्री चारच्या सुमारास येतं.  आपल्याला (म्हणजे बाबांना) जाग आलीच नाही तर ? या दोन प्रश्नांचं स्वरूप माझ्यासाठी अतिशय गंभीर असायचं. त्यामुळे सगळे दिवे मालवले तरी मी टक्क जागा असायचो. ... न जाणो  झोप लागायची ..... पण अश्या वेळी नकळत झोप लागायचीच. कुर्डुवाडी आलं की माढा येण्याची वर्दी मिळायची. अनावर झालेली झोप आवरत भीतीपोटी पट्कन उठून उतरायच्या तयारीला लागायचो. माढा स्टेशनात गाडी आली की खाली उतरणे हा एक सोपस्कार असे. पुण्या - मुंबई सारखे येथील फलाट गाडीला चिकटून नसत. गाडीच्या पायऱ्यांपेक्षा जमिनीशी सलगी करण्याऱ्या फलाटावर उतरणे ही कसरत असायची.  सामानासह आम्ही उतरतो न उतरतो तेवढ्यात लांब शिट्टी मारून गाडी सोलापूरला रवाना व्हायची. लांबवर जाऊन दिसेनाशी झाली तरी तिचा आवाज येत राहायचा. तो आवाज ऐकला की तिला झुक झुक गाडी हे नाव सार्थकी वाटायचं.

माढा - आडवळणाचं स्टेशन !  अपरात्री आलेली गाडी पार झाली आणि उतरलेले मोजके प्रवासी मार्गी लागले की स्टेशनवर चिटपाखरू नसलं तरी एखादं काळं कुत्रं नक्कीच सोबतीला असे. आत्यानी पाठवलेली बैलगाडी १० पैकी ९ वेळा वेळेवर आलेली नसायची. अहो जिथे ही पॅसेंजर कधी वेळेवर नसायची तिथे तो गाडीवान कशाला आधी येऊन थांबेल. अर्धवट पेंगुळल्या अवस्थेत त्या गाडीवान दादाची वाट पाहणे म्हणजे एक शिक्षा वाटायची. हुरड्याचा मोसम म्हणजे थंडी ! त्यात या ओसाड प्रदेशात तर हुडहुडीच भरायची.  त्या काळोखात दूरवर सर्वत्र निशाराणीचं साम्राज्य पसरलेलं... यथावकाश लांबवरुन बैलांच्या घुंगुरांचा आवाज आला की हायसं वाटायचं.  मग रूळ ओलांडून पलीकडच्या शेतात गाडीजवळ जायचं. बैलगाडीत विराजमान होणं हा एक अंगावर शहारा आणणारा प्रकार.  शहरातील पाहुणे येणार म्हणून आत्यानी बैलगाडीत मुद्दाम जाजम वगैरे टाकलेलं असायचं.  त्यामुळे गाडीत बसलो तरी घसरायला व्हायचं. त्यात बैलगाडीला एक नैसर्गिक उतार असतो. गाडी चालू लागली की आपण घसरून खाली तर पडणार नाही ना - या भीतीपोटी, मगाशी आलेली पेंग पार पळून जायची. माढा ते दारफळ हा रस्ता (रस्ता कसला धूळ आणि मातीची तयार झालेली किंवा उमटलेली वाटच ती) कच्चा असला तरी मला तो चांगलाच पक्का (बेरकी) वाटायचा. सतत धक्के देणारा, मधूनच आम्हाला उडवणारा आणि क्षितिजापर्यंत त्याच्याव्यतिरिक्त कसलीही सोबत नसणारा हा रस्ता खायला उठे. ५-६ किमी अंतर कापायला पाऊण ते एक तास लागायचा.  मजल दरमजल करत दारफळ गाठेपर्यंत झुंजू मुंजु झालेलं असायचं.  गावाची वेस आली की आधी धान्याचं गोदाम दिसायचं आणि मग त्यापलीकडे आत्याचा टुमदार बंगला !  पूर्ण गावात पक्क्या बांधणीचं तेवढं एकच घर होत. बाकी सगळी मातीची आणि शाकारलेली घरं.  तो (वि)स्मरणीय प्रवास संपून एकदाचं घरात शिरलं की हायसं वाटायचं. 

घरासमोर माढ्याहून येणारा रस्ता आणि मागील बाजूस अतिशय कष्टांनी आणि प्रेमानी फुलवलेली बाग. पहिल्या वाफ्यांत गुलाब, मोगरा पासून ते ऍस्टर, डेलिया पर्यंत रंगीबेरंगी  फुलझाडं. त्यामागे पेरू, चिक्कू, डाळिंब, पपई अशी फळझाडं आणि त्यापलीकडे टोमॅटो, मिरची, घोसाळं असे भाज्यांचे वाफे असत. आजच्यासारखी तेव्हा ना फोटोची क्रेझ होती ना सेल्फीची. पण तरीही ते सर्व आज तीस-चाळीस वर्षांनंतर सुद्धा मनाच्या कॅमेऱ्यात साठवलेलं आहे. गरमागरम चहा-नाश्त्याबरोबर सगळ्यांच्या ख्याली खुशाली, आम्हा बच्चे कंपनीचं कौतुक करत, पुढील ३-४ दिवसांचा कार्यक्रम उलगडायचा. हुरडा तर मुख्य आकर्षण पण त्याचबरोबर नदीवर शंख शिंपले गोळा करणे, शेतात फेरफटका मारणे, आदर्श शाळेत जाणे - प्रत्येक वेळेस शाळेला नवीन बहुमान प्राप्त झालेला असे. आत्या आणि काकांचा तेव्हा अभिमान वाटे. सरपंच तुकाराम शिंदे हे गावातील दरारा असणारं व्यक्तिमत्व. तेसुद्धा घरी यायचे. बाकीचे त्यांना वचकून असतात हे पाहून मीही त्यांच्यापासून चार हात दूर असे. पण त्यांनी सुरु केलेल्या धान्य पेढीचा उपक्रम अतिशय धोरणी आणि दूरदर्शी होता. संपूर्ण गावाला त्यात सामील करून, दुष्काळ असो वा उत्तम हंगाम, दारफळमध्ये कोणी कधी उपाशी राहिला नाही. दुर्दैवाने सरपंचांचं  १९८० च्या दरम्यान अकाली निधन झालं. तरीसुद्धा  सत्तरीच्या दशकात सुरु केलेला हा उपक्रम घट्ट वीण बांधून राबवला होता की त्यानंतर २० वर्षांनी सरकार दरबारी त्यावर शोध निबंध सादर झाला. त्यामध्ये नमूद केलं आहे की ह्या उपक्रमामुळे खेड्यातून रोजीरोटीसाठी स्थलांतर झालेलं नाही आणि याचं श्रेय धान्य पेढी उपक्रमाला आहे.

हुरडा पार्टीची मौज काही न्यारी असायची. सकाळी लवकर उठून बैलगाडीतून धक्के खात शेतावर जायचं. तिथे आधीच सगळी तयारी झालेली असायची. हुरड्याबरोबर विविध चटण्या, गूळ आणि इतर मेवा..... जमिनीत खड्डा करून लाकडं आणि कोळसे पेटवून, ज्वारीची कणसं भाजायला लावलेली असत. गरम गरम भाजलेली कणसं रगडून त्यातील हिरवे हिरवे दाणे काढून ते चटणीबरोबर खायला धमाल यायची. आजूबाजूला तयार शेती आणि त्यात एखाद्या डेरेदार वृक्षाखाली असा हुरडा खायला भाग्य असावं लागतं. हुरडा मळणाऱ्या एका भिडूने मला एकदा चांगलाच हिसका दाखवलेला आठवतंय. माझ्या हातात द्यायच्या बहाण्याने त्याने तो  गरमागरम हुरडा मळून माझ्या मुठीत दाबला. निखाऱ्यातून काढलेला तो हुरडा मला चांगलाच चटका लावून गेला.

वर म्हटल्याप्रमाणे हुरडा पार्टीची मजा येत असली तरी आत्याच्या घरी परत आल्यावर कंटाळा यायचा. शहरातील झगमगाटापुढे खेड्यात आकर्षक असं काहीच नव्हतं - किमान पक्षी तेव्हा तरी वाटायचं नाही. धुळीने माखलेला रस्ता, खेळायला बरोबरीचं कोणी नाही, रात्र झाली की दिवे जायची धास्ती, बाहेर भटकावं तर साप आणि काट्याकुट्यांची भीती. काकांकडे पुस्तकं खूप असायची. पण बहुतेक पुस्तकं वैचारिक स्वरूपाची असत. कॉलेजला जाईपर्यंत त्या पुस्तकांपासून मी जरा फटकून होतो. एकूण काय खेडं म्हणजे काही रमणीय ठिकाण असं तेव्हा वाटत नसे.

आधी साथी तुकाराम शिंदे आणि नंतर १९८२ मध्ये आत्या हृदयविकाराने गेली तरी काकांनी एकटेपणाने निवृत्तीपर्यंत शाळेला वाहून घेतलं होतं. त्यामुळे  ३-४ वर्षातून एकदा आम्ही दारफळला जात असू. १९९४-९५ नंतर मात्र काका सुद्धा दारफळ सोडून पुण्याला आले आणि आमचा दारफळशी असलेला दुवा तुटला.  काही वर्षांपूर्वी आम्ही औरंगाबाद, अजिंठा -वेरूळ सहलीला चाललो होतो. तेव्हा नगरजवळ अनेक हुरडा पार्टी रिसॉर्ट्स झाली आहेत असं कळलं. मुलांना हुरड्याची मजा कळावी म्हणून आम्ही अश्या एका ठिकाणी थांबलो होतो. तेव्हा मनातील दारफळचा कप्पा उघडला गेला. लहानपणी जरी दारफळ किंवा इतर खेड्यांच कौतुक वाटलं नाही तरी इतक्या वर्षांनंतर खेड्याचं आकर्षण वाटू लागलं. शहरातील धकाधकीतून पळून जायला खेड्याचा उतारा खुणावू लागला.

पण काळ बदलला आणि खेडी सुद्धा बदलत गेली. धुळीचे रस्ते जाऊन पक्के रस्ते आले. २४ तास वीज आली.  बैलगाड्यांची जागा ट्रॅक्टर, मोटरसायकल, जीप इत्यादींनी घेतली. या धबडग्यात दारफळ हे माझ्या आठवणीतील कुपीत जपून ठेवले आहे तसेच असेल का ? पुन्हा एकदा तिकडे जावसं वाटू लागलं. तोच रात्रीचा प्रवास, पहाटे माढ्याला उतरणे आणि बैलगाडीची वाट पाहणे....धक्के खात झुंजू मुंजु होईपर्यंत दारफळ !  पण मनात शंकेची पाल चुकचुकली - दारफळ सुद्धा जर आमूलाग्र बदललं असेल तर ? पण हा विचार किती स्वार्थी म्हटला पाहिजे. पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ हवा, एक्सप्रेस वे हवा,  मोठ-मोठे मॉल्स हवे, प्रशस्त रस्ते हवे, फ्लाय-ओव्हर्स हवे..... आणि दारफळ मात्र ..... चाळीस वर्षांपुर्वीचेच असावे !

या स्वार्थी विचाराने मी मनातून खजील झालो. मग असा विचार केला, दारफळनी एव्हाना कात टाकली असेल. त्या दारफळमध्ये आता ना माझ्या कोणी परिचयाचं आहे, ना मी कोणाच्या परिचयाचा ! आजच्या दारफळला ना मी ओळखू शकेन न दारफळ मला ओळखेल ! त्याक्षणी मी दारफळला जायचा विचार मनातून हद्दपार केला. माझ्यासाठी माझ्या आठवणींच्या कुपीतील दारफळ हाच माझा ठेवा आहे. मध्यंतरी माझ्या बायकोला तिच्या मैत्रिणीने एका काचेच्या कुपीत सोनचाफा दिला होता. जोपर्यंत ती कुपी उघडत नाही तोपर्यंत तो सोनचाफा वर्षानुवर्षे टवटवीत असतो. त्याच्या दर्शनातच त्याचा सुवास दडलेला असतो. दारफळला सुद्धा मी अश्याच कुपीत जपून ठेवलं आहे. दारफळच्या आठवणींच्या सुवासात मी त्याचं दर्शन घेत जाईन ! ! !

(सौ. मालू आत्या आणि ती. नूलकर काकांना समर्पित)

सुहास पानसरे 


Comments

  1. खुप सुरेख अगदी मूर्तिमंत चित्र डोळ्यांपुढे उभ राहील आणि मन भूतकाळात जाऊन डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

    ReplyDelete
  2. व्वा ..!! किती सूक्ष्म निरीक्षणं नोंदवली गेली आहेत तुमच्या मनःपटला वर ... खूप छान !! एक चित्रपट च डोळ्या समोर तरळून गेला ...

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. सुंदर व समर्पक शब्दांत ४० वर्षापुर्वीचा प्रवास व दारफळ शब्दबद्ध केले आहेस सुहास.
    पण आतापर्यंत सिना नदीतून खूप पाणी वाहून गेले आहे.
    काही ठिकाणी आठवणी जुळतील ही.
    पण बदल ही बराच आहे.
    एकदा प्रत्यक्ष बघायलाच हवा.

    ReplyDelete
    Replies
    1. सीना नदीतून बरेच पाणी वाहिले आहे - ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे दारफळ मध्ये अनेक बदल झाले असतील त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पुन्हा एकदा तिकडे जायला पाहिजे.

      Delete
  5. अक्षरशः डोळे पाणावले.. साथी तुकाराम आण्णा आणि नुलकर सर व नुलकर बाई यांचं कार्य खुप महान आहे.. आणि मन अभिमानाने फुलून जातं की आम्ही या दारफळ मध्ये जन्माला आलोय...
    पानसरे साहेब त्या मातीच्या रस्त्याची पक्या रस्त्याने व मातीच्या व कौलारू घरांची जागा दिमाखदार घरांनी जरी घेतली असली तरी तो मायेचा ओलावा अजून तसाच अबाधित आहे. तुम्ही कधीही नियोजन करा आपल्या दारफळ ला यायचं, तुम्हाला आज ही नक्कीच ते प्रेम व तो मायेचा ओलावा मिळेल.. आम्ही दारफळकर आपल्या स्वागता साठी स्टेशनवर नक्कीच असणार.
    *"आजही यावे दारफळ आपलंच असा...!"*
    - चित्रकार रत्नदीप बारबोले.
    कृपया या नंबर वर संपर्क करा.. 9011339677

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ! आपल्या स्नेहपूर्ण आमंत्रणाबद्दल धन्यवाद ! दारफळ यात्रा नक्की करूया. परत हुरड्यासाठीच !

      Delete
  6. सुहास खूप सुंदर. तुझ्या लेखाने माझ्याही आठवणीतले एक दारफळ उघडले. तसे आपल्या पिढीच्या प्रत्येकाचे एक दारफळ असेलच पण त्याचा सुवास सध्या बंद कुपीतूनच घ्यावा लागतोय. बऱ्याच जणांच्या भावनांना तू वाट करून दिलीस यातच तुझे श्रेय. अप्रतिम.

    ReplyDelete
  7. माझ्या पोस्टवर आपण दिलेली प्रतिक्रिया वाचून सहजच आपली प्रोफाईल उघडली आणि अचानकच मनस्वी तरंगांवर स्वार झालो.

    बंद कुपीतल्या दारफळाचा दरवळ आला.
    प्रसन्न वाटले आणि हरवलेल्या बालपणाच्या आठवणींनी थोडे सैरभैर झाल्यासारखेही जाणवले.

    पण बालपण हरपले तरी आठवणींची कुपी सोबत असतेच, या विचाराने दिलासा मिळाल्यासारखा वाटला.

    आपले बालपण काळाच्या उदरात गडप झालेले असले तरी मनातले मूलपण जपत राहावे हेही जाणवले.
    एकूण, सुंदर वाचनानुभव!
    धन्यवाद! 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी. आपले ब्लॉग्स मी वाचतो. सैनिकी जीवनाबद्दल काही समज काही गैरसमज आणि बरेच कुतूहल असते. आपल्या ओघवत्या शैलीतील ब्लॉग वाचणे हा एक आनंददायी अनुभव असतो.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

अस्पृश्य राजकारण

।।ग्राहक देवो भव ।।