मुंबई पुणे मुंबई



महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक भावविश्वात पुणे -मुंबई प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या  काही दशकात मराठी माणूस अमेरिका , यूरोप आणि इतरत्र जगभर फिरू लागला तरी पुणे-मुंबई प्रवासाची सर त्याला नाही. उगीच नाही  वसंत बापटांनी  "दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत" ही कविता लिहिली ज्यात या प्रवासाचे समर्पक वर्णन केले आहे.

माझे आजोळ मुंबई ! त्यामुळे हा प्रवास म्हणजे माझ्या बालपणापासून आजपर्यंत सख्खा सोबती आहे. बालपण, तारुण्य आणि आता मध्यमवय असा माझा प्रवास पुणे मुंबई रस्त्यावरून होत गेला म्हटले तर अतिशयोक्ती नाही. कळायला लागल्यापासून मला या प्रवासातील एकेक मैलाचा दगड पाठ आहे. सकाळी ...नव्हे पहाटे ...उठून सहाची जनता एक्सप्रेस (तेव्हा तिचे 'सिंहगड’ असे नामकरण झाले नव्हते) पकडायची.  बहुतेक वेळेस बाबा स्टेशन वर सोडायला यायचे. आईबरोबर मी आणि धाकटा भाऊ संजय अशी आमची प्रवासी टीम असायची.  गाडी सुटली की शिवाजीनगर, खडकी गेलं की पुढची स्टेशन्स झोपेत निघून जायची.  लोणावळा चिक्कीचे विक्रेते येऊन झोपमोड करायचे. खंडाळा स्टेशन हे डोंगराच्या कुशीत, इतर स्टेशन्सच्या माळेतून सुटलेल्या मण्यासारखे  वाटायचे. मग प्रवासाचा रोमांचक भाग - घाट सुरु व्हायचा. त्यातील सगळे सव्वीस बोगदे क्रमानुसार मोजायचा उपक्रम सुरु व्हायचा. थोडं दुर्लक्ष झालं कि एखादा बोगदा निसटायचा आणि सगळेच गणित फसून जायचं. कधी कधी  बोगद्यात शिरताना वरून पाण्याची धार लागलेली असायची. बाहेर सह्याद्री हिरवागार गालिचा पांघरल्यासारखा मनमोहक दिसायचा. उन्हाळयात बोडका दिसणारा डोंगर, पावसाळयात खुलून यायचा आणि थंडीत धुक्याची दुलई लपेटून झोपी गेलेला असायचा. घाटातील मंकी हिल, जांबरुंग स्टेशनात काळी मैना, जाम्ब असा जंगली मेवा मिळायचा.

घाट संपून ट्रेन खोपोली कडे शेवटच्या उतारावर आली कि मागे जाणारा सह्याद्री पाहून आपणच काही मागे सोडुन चाललो आहोत असं वाटून हूर हूर लागायची. आता वातावरण एकदम बदललेले असायचे. आल्हाददायक हवा संपून दमटपणा नाकात शिरायचा. एव्हाना पोटात कावळे ओरडू लागायचे आणि कर्जतच्या वड्यांचा ट्रे घेऊन वडेवाला यायचा.  पुढे कल्याण आणि नंतर ठाणे गेले की अस्सल मुंबई सुरु व्हायची. ऊंच इमारती, लोकल ट्रेन्स आणि बेस्ट ची डबल डेकर  बस  यांचं दर्शन झालं म्हणजे मुंबई आल्याची दवंडीच पिटली जायची म्हणा ना ! पुणे - लोणावळा प्रवासात दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने येणारी स्टेशन्स आता पाच मिनिटे सुद्धा घेत नसत. बाजूच्या ट्रॅकवर स्लो लोकल आली की तिला सुसाट वेगाने मागे टाकत जायला मजा यायची. दादरला उतरायचे म्हणजे सायन गेले की सामान काढणे, दाराच्या दिशेने सरकणे असा द्राविडी प्राणायाम सुरु व्हायचा. प्रत्यक्ष दादरच्या प्लॅटफॉर्मला गाडी लागली की खरे तर मुंबईच्या गर्दी आणि वेगापुढे बावचळायला व्हायचे. पण हा प्रवास मी वर्षानुवर्षे केला तरी त्याची गोडी टिकून राहिली आहे.  "जनता" ची "सिंहगड" झाली. पुढे ती डबल डेकर झाली. काही वर्षात "सिंहगड" सोडून "दख्खन राणी" च्या कुशीत आल्यावर  त्याच प्रवासाचा रुबाब अजून वाढला.

१९८२ साली दिल्लीला झालेल्या आशियायी स्पर्धेला ST  महामंडळाने आरामदायी बसेसची सोय केली होती. स्पर्धा संपल्यावर या बसेस मुंबई - पुणे मार्गावर रुजू झाल्या..... आणि ट्रेन प्रवासावर पहिला ओरखडा उमटला ! चार तासात, विना थांबा आरामदायी प्रवास आणि तोसुद्धा दर अर्ध्या तासाला एक बस ! या प्रवासाला नवीन आयाम मिळाला तरी "एशियाड" आणि "दक्खन राणी" समजूतदार सवतीप्रमाणे नांदत असत.  पुढे इंजिनिअरिंग झाल्यावर नोकरीनिमित्त हाच प्रवास मुंबई-पुणे असा सुरु झाला. तोपर्यंत पुण्याहून मुंबईला जायला सिंहगड - डेक्कन क्वीनच्या जोडीला संध्याकाळची 'इंद्रायणी' ही अजून एक बहीण आली. नियमित पास धारकांच्या डब्यात सर्व ओळखीच्या चेहेऱ्यांबरोबर हा प्रवास म्हणजे साप्ताहिक सोपस्कार बनला.  या प्रवासाचे शतक कधी पूर्ण झाले याची कल्पना नाही. पण यात एक प्रवास कायम लक्षात राहिला आहे. बाबरी पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. रविवार पर्यंत सर्व सुरळीत झालं असेल असे वाटून, इंद्रायणीने पुणे सोडले. सर्व काही आलबेल नाही याचा सुगावा लगेच लागला कारण नेहेमी तुडुंब भरलेला पास धारकांचा डबा आज निम्मा सुद्धा भरला नव्हता. खिडकी मिळाल्याचं समाधान मानून प्रवास सुरु झाला. लोणावळा, कर्जत, कल्याण मागे टाकून ठाणे आलं आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी येऊन सर्व डब्यातील लोखंडी खिडक्या बंद केल्या. तेव्हा  मनात शंकेची पाल चुकचुकली. बाहेर तुरळक ठिकाणी दंगा चालू आहे आणि दगडफेकीपासून संरक्षण म्हणून खिडक्या बंद केल्याचं आम्हाला सांगितलं. यथावकाश गाडी दादरला आली. प्लॅटफॉर्म वर उतरून पाहिलं तर दादरचा नेहेमी ओसंडून वाहणारा प्लॅटफॉर्म चक्क सुना सुना होता. दादरचं असं रूप तेव्हा जे पाहिलं तसं कधीच नव्हतं. 

एशियाड किंवा ट्रेनच्या वेगाची काळाशी स्पर्धा चालू झाली..... वर्षे नव्हे  तर तब्बल दोन दशके झाली आणि भारतातील पहिला द्रुतगती महामार्ग आकाराला आला. हा घाव मात्र रेल्वेच्या वर्मी बसला. पुणे - मुंबई प्रवासाचं प्रमेयच बदलून गेलं.  तीन तासात आपल्या घरातून इच्छित स्थळी मुंबईत पोहोचण्याचे सुख या महामार्गाने दारात आणले. पण झुक झुक गाडीची सर त्याला नव्हती. सुरुवातीला तर या मार्गावर तुरळक वर्दळ असे. पण लवकरच तो दुथडी भरून वाहू लागला. प्रशस्त सहा पदरी गुळगुळीत रस्ता, एकही सिग्नल किंवा रोड क्रॉसिंग नाही.  वेग मर्यादा ८० असली तरी (ती पाळायची थोडीच असते ! )  १००-१२० च्या दमात एक तासात पार करायची शर्यतच जणू. घरून निघून रावेत मागे टाकून द्रुतगती मार्ग सुरु झाला की निवांत वाटू लागते. टोलचे देणे दिले की हक्काने पुढील मार्गक्रमण सुरु ! मळवलीचे वळण घेतल्यावर लोणावळा-खंडाळा परिसरातून हवेतून जात असल्याचा अनुभव येतो. बराच वेळ एका रेषेत सरळसोट जाणाऱ्या महामार्गाला घाटात मुरड घालून घाटाच्या वळणावळणानेच जावं लागत. इतका वेळ पोटातील पाणी हलत नाही म्हणता म्हणता संपूर्ण शरीर घुसळलं जात. ट्रेनचा असो नाही तर द्रुतगतीचा प्रवास असो, घाटाचे सौन्दर्य दोन्हीकडे अनिवार्य प्रश्नासारखे आहे. एकदा का घाटाच्या मिठीतुन द्रुतगती सुटला की दोन टोल लागतात - पहिला "दत्त " च्या गरमागरम आणि अस्सल मराठी नाश्त्याचा आणि दुसरा खालापूरचा टोल नाका.  "दत्त" ला न थांबता जाणे म्हणजे चितळ्यांच्या दुकानात जाऊन बाकरवडी न आणण्यासारखे आहे. येथून अर्ध्या तासात हा महामार्ग आपली वाट सोडतो आणि मुंबईच्या जलद वाहतुकीच्या सागरात आपण जाऊन मिळतो.  पुढचा प्रवास मुंबईकरांच्या तालावर (म्हणजे वेगावर) करून इच्छित ठिकाणी आपण पोहोचतो.

मध्यंतरी हा प्रवास करताना घाटात बाजूने ट्रेन जाताना दिसली आणि मन त्या ट्रेनकडे ओढले गेले. का कुणास ठाऊक पण केविलवाणी वाटली.... पण मग विचार केला याला आपणच जबाबदार आहोत. गेल्या दोन दशकात दोन वेळा सुद्धा या ट्रेन प्रवासाची मजा घेतली नाही. आयुष्यात एका आनंदाला आपण मुकत आहोत. पण हे सुद्धा अर्धसत्य आहे ! बालपणीच्या किंवा शाळेतील धमाल मजा सोडून आपण तारुण्यात किंवा कॉलेजात जातो.... आणि तिथेही वेगळी धमाल सुरु होते. तसंच या  प्रवासाने सुद्धा एका वळणाकडून दुसऱ्या वळणाकडे कूस बदलली आहे. प्रवास तोच आहे पण मजेची स्थानकं बदलली आहेत !
  
सुहास पानसरे 

Comments

  1. खूप सुरेख वर्णन.

    ReplyDelete
  2. अप्रतिम 👍
    छोट्या छोट्या गोष्टी छान टिपल्यात.

    ReplyDelete
  3. सुहास, फारच सुरेख वर्णन, अगदी चपखल!

    ReplyDelete
  4. व्वा रे मित्रा एकदम झकास शब्दांकन की जणु आम्ही रेल्वेत पण बसलो आणि एशियाड ने दादर पण गाठले. . .. खरंच सुंदर लिहले आहेस

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

अस्पृश्य राजकारण

।।ग्राहक देवो भव ।।