बदलता काळ !


TIME या नियतकालिकाने लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आणि नंतर पंतप्रधान श्री. नरेंद मोदी यांच्यावर दोन विरुद्ध विचांराचे लेख प्रसिद्ध केले.  निवडणूक शेवटच्या टप्प्यात  आली असताना "मोदी म्हणजे देशाचे विभाजन कर्ते" असा पहिला लेख होता. निवडणुकीतील यशानंतर "मोदी देशाला एकसंध जोडणारे" असा दुसरा लेख होता.  "Time  has changed" असे उपहासात्मक संदेश व्हाट्सअप वर फिरू लागले.  पण तसा विचार केला तर time  म्हणजे काळ खरंच बदलला आहे.  

‘आता काळ बदलला आहे’ हे वाक्य लहानपणापासून कानावर पडत आले आहे. कालानुरूप आपण बदलले पाहिजे हेसुद्धा  तितकेच खरे आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव बहुतेक प्रत्येकाला येतो.  पण काही बाबतीत काळ आणि  वेळ हे समानार्थी आहेत.  मला वाटणारा बदललेला काळ म्हणजे घड्याळातील बदललेली वेळ आहे.  तसं पाहिलं तर काळ, काम आणि वेग याच्याशी ओळख आणि नंतर झटापट शाळेत असताना सहावी सातवीत झाली होती.  व्यवहारात त्याचा उपयोग असला तरी तेव्हा गणितातील मार्कांसाठी त्याचा जास्त उपयोग वाटत असे. काळ पुढे सरकत गेला आणि मी शालेय शिक्षणातील महत्त्वाच्या पडावावर म्हणजे  दहावीत येऊन पोहोचलो. आता काळ, वेग आणि अभ्यास यांची गणितं रोज सोडवावी लागली. तेव्हा वेळेचं महत्त्व पटू लागलं. त्याच सुमारास माझा लंगोटीयार मित्र मंगेश याच्या मनगटावर स्वतःचे पहिले घड्याळ आले. काळ्या डायलचे आणि रात्रीच्या अंधारात रेडियम मुळे काटे चकाकणारे  ते घड्याळ माझ्या चांगले लक्षात आहे. आमची मैत्री त्यावेळच्या मॉंटेसरी पासून होती. आमची जोडी सगळीकडे - शाळेत, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये एकदम प्रसिद्ध होती. इतकी कि आज सुद्धा अनेकजण त्याची आठवण काढतात.  माझा शास्त्र शाखेचा कल आणि मंगेशचा शास्त्र शाखेशी असलेला ३६ चा आकडा पाहून आमची जोडी आता फुटणार हे निश्चित होते.  त्यामुळे आमच्या मैत्रीची आठवण म्हणून मंगेशच्या आईने मलाही घड्याळ  द्यायचा घाट घातला. त्याकाळी घड्याळ म्हटले कि HMT असे समीकरण होतं. HMT च्या शोरूममध्ये गेल्यावर  ट्रे मधील विविध मॉडेल ची घड्याळं बघून मी हरखून गेलो होतो. त्याकाळी "कांचन" आणि "रजत" हि अनुक्रमे सोनेरी आणि चंदेरी साज असलेली घड्याळं उच्च कोटीची होती. नात्यातील एका लग्नात नवरदेवाने ‘कांचन’ ची मागणी केल्याचे मला आठवते.  नोकरी लागल्यावर आपल्या मनगटात एवढी शक्ती यावी कि स्वतःच्या हिंमतीवर आपण "कांचन" घेऊ असे मी तेव्हा ठरवले होते.  तोपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्याला साजेल असे घड्याळ मी निवडले. मला आवडलेल्या मॉडेल मध्ये रेडियम नाही ही बाब मन थोडं खट्टू करून गेली. ते घड्याळ मी इंजिनियर होईपर्यंत वापरल्याचं मला आठवत आहे. दर वाढदिवसाला नवीन मोबाईल मिळतो तशी घड्याळ मिळायची तेव्हा ना पद्धत होती ना ऐपत.   

आमचा शाळेत जायचा रस्ता म्हणजे डेक्कन जिमखाना बस स्टॉप ते लकडी पूल आणि पुढे अलका टॉकीज चौकातून शाळा असा असे. लकडी पुलाच्या अलीकडे, डायमंड वॉच कंपनी हे दुकान लागे.  तिथे नाना प्रकारची  मनगटी, भिंतीवर लावायची आणि टेबलवरील घड्याळे मांडलेली - खरं तर टांगलेली असत.   शाळेत  येता जाता आम्ही कुतूहलाने त्या घड्याळांकडे बघत असू.  एके दिवशी त्या दुकानात दर्शनी भागात इलेक्ट्रॉनिक घड्याळ आलं.  नेहेमीच्या गोल डायल ऐवजी थेट आकडे दाखवणारे ते (डिजिटल) घड्याळ होतं. त्यात सतत बदलणारे सेकंदाचे आकडे, मिनिट झाल्यावर बदलणारे त्याचे आकडे आणि तसेच तासाचे आकडे. कितीही वेळ आणि वेळा हे घड्याळ बघितलं तरी समाधान होत नसे. रस्त्यावरून जाणारे अनेक जण तिथे थांबून याकडे कुतूहलाने बघत असत. शाळेची  वेळ होईल म्हणून शेवटी तेथून  काढता पाय घ्यावा लागेल.  एकूणच सगळे जादुई वाटायचे.  आयुष्यात पहिल्यांदा  काळ बदलेला पाहिला तो असा.


शाळा झाल्यावर आम्हाला क्रीडांगण असे.  एकदा मैदानी खेळ खेळताना माझं घड्याळ मी आमच्या मार्गदर्शकाकडे दिले. खेळ संपला आणि घरी गेल्यावर लक्षात आलं की हातावर घड्याळ नाही. दुसऱ्या दिवशी आमच्या प्राचार्यांकडून  बोलावणं आलं. त्यांच्याकडून घड्याळ परत घेताना त्यांनी एक अट घातली - वेळेचा सदुपयोग करणार असशील तरंच घड्याळ परत मिळेल. त्यांना दिलेलं वचन पाळण्याचा प्रयत्न नेहेमी असतो. वेळेची समज आली ती या छोट्याश्या  प्रसंगातून. 

पुढे परदेशात गेल्यावर तेथील लोकांचा वक्तशीरपणा पाहून वेळेचं भान पाळणे किती महत्वाचे आहे ते  प्रकर्षाने जाणवले.  इंग्लंड मध्ये एकदा घर बघायला गेलो असताना केवळ तीन मिनिटे उशीर झाला होता. पण घर मालकीण वाट बघून निघून गेली.  नेपोलिअन सुद्धा वॉटर्लूला तीन मिनिटे उशिरा पोहोचला आणि युद्ध हरला ...त्याला काय वाटले असेल त्याची पुसटशी जाणीव यातून झाली.

बालपणीचा असणारा सुखाचा काळ संपून कॉलेजमधील रम्य काळ सुरु झाला आणि नुसतेच वेळ दाखवण्याऱ्या घड्याळाची जागा आता तारीख-वार सुद्धा दर्शवणाऱ्या घड्याळानी घेतली. त्याचवेळी अजून एक सूक्ष्म बदल झाला. सकाळी उठल्यावर चहाबरोबर वर्तमानपत्र जसे अविभाज्य घटक असते, तसं कॉलेज किंवा ऑफिसला जाताना घड्याळाला किल्ली देणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया असायची. नव्या घड्याळात रोज  किल्ली द्यायची गरज उरली नाही.  एकविसावं शतक उजाडलं आणि भारत जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागला. शेकडो नव्हे हजारो लाखो भारतीय विविध देशांत संचार करू लागले. संपूर्ण जगात माहिती तंत्रज्ञानात भारताने अग्रणी स्थान पटकावले. भारतातील कार्यालयातून जगातील विविध देशांना येथून सपोर्ट दिला जाऊ लागला. एकाच वेळी स्थानिक आणि ‘ऑन साईट’ वेळ माहित असणे आवश्यक झाले. साहजिकच एकाच घड्याळात दोन देशांची वेळ दिसण्याची सोय झाली. अनेक देशांशी व्यवहार करणाऱ्या ऑफिसात भिंतींवर त्या त्या देशांची वेळ दाखवणारी घड्याळे टांगलेली दिसतात.  मुले-नातवंडे अमेरिकेत असताना इकडे आजी-आजोबांना तिकडे किती वाजले असतील हे गणित मांडायचे कष्ट करायची गरज राहिली नाही.

मागील काही वर्षात तर  घड्याळाच्या काट्यावर चालणारे आपले जीवन स्मार्ट फोनच्या टचस्क्रीनवर दिसू लागले. आता वेळ बघायला मनगटाकडे बघायची वेळ येत नाही.  मोबाइल कडे नजर टाकली कि वेळ मारून नेता येते. मीटिंग चालू असताना कंटाळा आला तर किती वाजले बघण्यासाठी घड्याळाकडे नजर टाकणे मॅनरलेस दिसते. त्यावर मोबाइल चा उतारा फिट बसतो. आता तर मनगटावर घड्याळ असणे अनावश्यक झाले आहे. माझ्या आजोबांनी अनेक चीजवस्तू ज्याचा काही उपयोग नाही तरी जपून ठेवल्या होत्या.  त्यांच्या काळाची आठवण म्हणून असेल. तसंच काहीसं मनगटावरच्या घड्याळाचं झालं आहे. असून अडचण नाही आणि नसून खोळंबाही नाही...... बरं स्मार्ट फोन फक्त मनगटी घड्याळाचा ‘काळ’ बनला असं नाही. पूर्वी  सकाळच्या गजराला ठराविक साच्याचं गोल आणि स्टील फ्रेमचं घड्याळ सगळीकडे - विशेषतः होस्टेलवर हमखास असायचं.  ऑफिस मध्ये टेबल सजवण्याव्यतिरिक्त या घड्याळाला आता काही काम उरलं नाही. दिवाळीत गिफ्ट म्हणून द्यायची एक वस्तू अशा प्रकारे बाद  झाली.

काळ बदलला, काळाप्रमाणे आपण बदललं पाहिजे हे खरं आहे. पण इथे तर कालानुरूप खुद्द काळच बदलला आहे असं  म्हटलं तर वावगं होणार नाही. असा हा काळाचा महिमा !

सुहास पानसरे 



Comments

Popular posts from this blog

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

अस्पृश्य राजकारण

।।ग्राहक देवो भव ।।