बीबीसी त्यांची आणि आपली


नव्वदीच्या दशकात भारतात “इलेक्ट्रॉनिक मीडिया” क्रांती झाली. शेकडो चॅनेल्स सुरु झाले आणि त्यातील कित्येक तर फक्त बातम्यांना “वाहून” घेतलेले (म्हणूनंच  वृत्त-“वाहिनी” म्हणत असावेत). कोणतीही बातमी सर्वात आधी द्यायची स्पर्धा यातून सुरु झाली. विविध प्रकारे दर्शकांची संख्या आणि टीआरपी वाढवण्यासाठी 'ब्रेकिंग न्यूज' चा फंडा निघाला. त्याअनुषंगाने चालणाऱ्या चर्चांची गुऱ्हाळे सुरु झाली.  खरे तर स्पर्धेमुळे ग्राहकाला वेगवेगळे पर्याय तर मिळतातच पण  सेवेचा दर्जा उंचावतो. पण असे न होता ब्रेकिंग न्यूज आणि त्यावरील चर्चा हा एक फार्स बनला आहे.

टीव्ही वर बातम्या देणाऱ्या वाहिन्यांमध्ये जगभरात बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन) अग्रणी आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी दिल्लीबाहेर होते. त्यांच्यापर्यंत हत्येविषयी उलट सुलट माहिती जात होती. असं म्हणतात कि त्यावेळी राजीव गांधीनी बीबीसीवरून बातमीची खातरजमा करून  घेतली. अशी विश्वसनीयता आज आपल्याला कोणत्या भारतीय वाहिनीविषयी वाटते ? भारतच काय, पण अमेरिकेत सुद्धा तेथील इलेक्ट्रॉनिक मीडिया हे एकेका पक्षाला बांधलेले दिसतात. अशा वेळेस वस्तुनिष्ठ वार्तांकन दुय्यम ठरून आपल्याला सोयीचे तेवढेच सांगणे अपरिहार्य ठरते. अशा वार्तांकनाच्या दर्जापेक्षा कर्कश्श आवाजात बातमी रेटत राहणे यालाच महत्व येते. यातून चॅनेलचा टीआरपी वाढतो, जाहिराती मिळतात. पण यामुळे प्रेक्षक वैतागले नाही तरच नवल.    

इंग्लंडमधे असताना बीबीसी हा माझा सोबती होता. मला सतत फिरतीवर जावे लागे. एका दिवसात तीनशे मैल (सुमारे पाचशे किमी) ड्रायविंग करत असे. एकटाच प्रवास करताना कारमध्ये बीबीसी रेडिओ लावला की अनेक माहितीपर आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकणे हि एक मेजवानी असे. २००६ मधील एका घटनेचे वार्तांकन मला आठवते. त्यावेळी एका  ख्रिश्चन एनजीओचे  स्वयंसेवक नॉर्मन केम्बर यांचे इराकमध्ये अपहरण झाले. चार महिन्यांनी त्यांची सुटका झाली. ते जेव्हा इंग्लंडला परतले तेव्हाचे बीबीसीने केलेले वार्तांकन आपल्या मिडियासाठी आदर्श वस्तुपाठ ठरेल. त्यांचे विमान हिथ्रोला उतरल्यापासून आधी सरकारी सोपस्कार पार पडणे आणि नंतर त्यांचे लंडन जवळील घरी आगमन, याचे वार्तांकन अतिशय संयत पद्धतीने केले होते. केम्बर कुटुंबीयांनी या प्रसंगी मीडियाने कुटुंबाची प्रायव्हसी जपावी अशी विनंती केली होती. याचा मान राखत बीबीसी (आणि इतर वाहिन्यानी देखील) आपले कॅमेरे त्यांचा घरापासून किमान २०० मीटर दूर ठेवले होते. केम्बर कुटुंबियांच्या मुलाखती, घराच्या सर्वबाजूंनी फेरफटका आणि त्याचे वार्तांकन असा काहीही अगोचरपणा त्यांनी केला नाही. जे काही समालोचन चालू होते, ते जबाबदारीने आणि केम्बर कुटुंबीयांच्या इच्छेचा मान राखून केले गेले.  मला खात्री आहे असा प्रसंग भारतात घडला तर त्यातील कुटुंबियांच्या लहानपणापासूनच्या मित्रांच्या मुलाखती, अति दूरच्या नातेवाईकांचे किस्से, शेजारी राहणाऱ्यांचे बाइट्स याचा रतीब आपल्या मीडियाने घातला असता.    

बीबीसी आणि आपल्या मीडियामध्ये जाणवणारा दुसरा फरक म्हणजे 'ब्रेकिंग न्यूज'. एखादी महत्वाची आणि बहुतेक वेळेस अनपेक्षित बातमी ही खरेतरब्रेकिंग न्यूज’ ! अशी बातमी खरोखरीच लक्षवेधी असावी अशी अपेक्षा असते. नुकतीच आलेली प्रत्येक बातमी महत्वाची असली तरीब्रेकिंग न्यूज’ नसते.  पण हे भान आपल्या मीडियाने केव्हाच सोडले आहे.  अनेकदा अशा न्यूजमध्ये काहीही अनपेक्षित किंवा धक्कादायक नसते.  याची जाणीव आपल्याला कधी होणार ?

घटनास्थळाहून वार्तांकन कसे करावे (किंवा करू नये) याचं प्रशिक्षण आपल्या चॅनेल्सना देणे आवश्यक आहे. कल्पना करा की ओडिशाच्या किनाऱ्याला वादळाने झोडपले आहे आणि तेथून वार्ताहर थेट संवाद साधत आहे. अश्यावेळी हमखास होणारा संवाद असा असतो.

अँकर "अमूक"  : नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार ओडिशाच्या किनाऱ्यावर वादळ धडकले असून ताशी १२० किमी वेगाच्या वाऱ्यांनी हाहाःकार माजवला आहे. पण पूर्वकल्पना असल्याने हजारों  लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने प्राणहानी झालेली नाही. तरीही शेकडो घरे आणि अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आमचे वार्ताहर "तमुक" तिथे आहेत. जाणून घेउया प्रत्यक्षदर्शी रिपोर्ट. "तमुक" काय सांगू शकाल तेथील परिस्थितीबद्दल ? 
वार्ताहर "तमुक" : तुझं बरोबर आहे “अमुक”. ओडिशाच्या किनाऱ्यावर वादळ नुकतेचं धडकले असून ताशी  १२० किमी वेगाने वारे वाहात आहे. प्रशासनाने  पूर्वकल्पना दिली असल्याने हजारों  लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं  होतं. त्यामुळे  प्राणहानी झालेली नाही. तरीही शेकडो घरे आणि अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अँकरनी सांगितलेली माहिती घटनास्थळावरून वार्ताहराने तशीच्या तशीच सांगावी ? त्यामध्ये नवीन किंवा विशेष काहीच नसावे ! त्यापुढे जाऊन हद्द म्हणजे, त्यातील विडिओ क्लिप ! हा अजून एक नमुना असतो. ४-५ सेकंदाची अस्पष्ट दिसणारी आणि मुख्य व्यक्तीच त्यातुन गायब असणारी एक टुकार क्लिप पुनःपुन्हा का दाखवली जाते त्यांचे त्यांनाच ठाऊक. अरे वार्तांकन करताय कि चेष्टा करताय ?

आपल्या मीडियाचं सर्वात आवडतं आणि प्राईम टाइम सदर म्हणजे दिवसातील एक बातमी निवडून (मग ती कितीही सुमार दर्जाची असली तरी) त्यावर चर्चा घडवून आणणे. याबाबतीत बीबीसी आणि भारतीय चॅनेल्सची यत्किंचितही बरोबरी होऊ शकत नाही. बीबीसीवर अशा कार्यक्रमात सदर विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना सहभागी केले जाते. विषयाच्या सर्व बाजूंनी प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये केवळ भावनात्मक चर्चा ना करता, मुद्देसूद आणि योग्य आकडेवारीनिशी (फॅक्टस अँड फिगर्स) विषय मांडला जातो. दोन्हीही बाजूंनी बोलणारे तज्ज्ञ एकमेकांच्या मुद्द्यांवर असहमत असतात, पण एक जण मुद्दा मांडत असताना त्याला मधेच तोडून दुसरा आपला मुद्दा रेटत नाही. आपल्याकडे मात्र याच्या उलटे चित्र असतं. शेतमालाचा रास्त भाव यापासून ते डोकलाम प्रश्न यापैकी कोणताही मुद्दा असो, चर्चेत सहभागी होणारे निम्मे चेहेरे हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळपद राखून असतात. मुद्देसूद चर्चेऐवजी आरडाओरडा करून, जास्तीत जास्त वेळ आपणच कसे बोलत राहू हाच बहुतेकांचा बाणा असतो. मूळ मुद्दा सोडून, भलतीकडे भरकटणारी चर्चा मूळपदावर येतच नाही. जलयुक्त शिवार ते व्याघ्र संवर्धन अशा विषयांत अभ्यासपूर्ण चर्चेऐवजी एका घटनेवरून अतिरेकी निष्कर्ष काढले जातात आणि त्याचा चावून चोथा केला जातो. मला तर वाटते या चर्चांचा खरा हेतू त्या विषयातील सर्व बाजू लोकांपुढे मांडणे नसून निव्वळ कार्यक्रमाच्या अँकरचा टीआरपी वाढवणे एव्हढाच असतो. बहुतेक अँकरसुद्धा सहभागी लोकांत भांडणे लावण्यात धन्यता मानतात. कर्कश्य सादरीकरण करायचा वसा अर्णब गोस्वामींकडून मग सगळेच उचलतात. एकेक चर्चेत आठ-आठ जण सहभागी झाले तर कोणालाच पुरेसा वेळ मिळत नाही.  आसाराम बापू प्रकरणानंतर, अश्याच एका चर्चेत 'नेहेमीचे यशस्वी' सहभाग (खरे तर महाभाग) होतेच, पण दोन योगगुरु सुद्धा सहभागी झाले होते. ते अतिशय योग्यप्रकारे या विषयाची मीमांसा करत होते. समाज अश्या प्रवृत्तींना का बळी पडतो आणि  हे कसे टाळता येईल याबद्दल हे दोघेही उत्तम मार्गदर्शन करत होते.  अर्थातच, त्यांच्या विवेचनात चमचमीत काहीच नव्हते. त्यामुळे अँकरने त्यांना कमीत कमी वेळ दिला आणि  बुवाबाजी करण्याऱ्यांचे आश्रम आणि  तेथील कारवाया यावरच जास्त भर दिला. मला खात्री आहे त्या योगगुरूंना कुठून आपण यात सहभागी झालो असे वाटले असेल.

आपल्याकडे  विचार स्वातंत्र्य आहे, पण हे तर अविचार स्वातंत्र्य आहे कि काय अशी शंका येते. . कधी कधी वाटतं कुठे बीबीसी आणि कुठे आपले चॅनेल्स. पण तसं पहिलं तर आपली सुद्धा बीबीसीच आहे की – “ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन” ऐवजीभारतीय बाष्कळ चॅनेल्स” ! ! !

Comments

  1. फारच समर्पक अवलोकन परंतु मला एक प्रश्न पडतो की जर दर्शक कर्कशपणा मुळे त्रस्त झाले आहेत तर TRP वाढतो कसा?

    ReplyDelete
  2. सुंदर निरीक्षण आणि मस्त लिखाण👌👍
    "अविचाराच स्वातंत्र्य" एकदम सही🙏🏻

    ReplyDelete
  3. Excellent write up. Precisely narrated and pin pointed examples. Pl write more and share with us.

    ReplyDelete
  4. 1) आपले जवळ जवळ सर्व मराठी वाहिन्या मराठी भाषेचा पार चोथा करतात. .. त्यांना साधे व्याकरण , बरोबर उच्चार सुध्दा करता येत नाहीत . जेष्ठ समजणारे पत्रकार सुद्धा पाणी ला पानी (ण ला न ) एवढे पाहिलीत शिकवलेले मराठी सुद्धा बोलु शकत नाहीत.
    2) दररोज फक्त ठराविक टाळकीच कोणत्याही विषयावर अधिकार वाणीने कोणत्याही विषयावर मग तो विज्ञान तंत्रज्ञान , अर्थकारण , समाजकारण, पर्यावरण , संविधान , विधी कायदा असे बोलु शकतात. ते एवढे जर तज्ञ् असतील तर त्यांची ही का परिस्थिती झाली हे समजण्या पलीकडे आहे ...त्यामुळे या वाहिन्या फक्त करमणूक म्हणूनच पाहाव्यात ...

    ReplyDelete
  5. अगदी योग्य लिहिले आहेस, सुहास. बीबीसी एकमेवाद्वितीय आहे.
    तुझ्या या नवीन उपक्रमाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.

    ReplyDelete
  6. योग्य विचार. बीबीसी फार एेकत नाही पण आपली चॅनल्स् फक्त गोंधळ घालतात ही वस्तुस्थिती आहे आणि हे कार्यक्रमाच्या मूळ गाभ्याशी फारकत घेतल्याने होते. आपल्याला यातून काय साध्य करायचे आहे हेच यांना कळत नाही किंवा कळवून घ्यायचे नाही. आपण श्रोते म्हणून त्यात फार वेळ न घालविणे हे उत्तम.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

अस्पृश्य राजकारण

।।ग्राहक देवो भव ।।