वारश्याची वाताहत


वर्तमानातील घटनेवरून भूतकाळात जाऊ लागलो की आपण वृद्धत्वाकडे झुकलो असं समजावं. या न्यायाने मी वृद्धत्वाकडे झुकू लागलो कि काय ही भीती वाटावी अशी बातमी कानावर आली. आर. के . स्टुडिओ मध्ये शेवटचा गणेशोत्सव साजरा झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली हे त्याचे निमित्त. माझीच काय पण त्यामागील किमान दोन पिढ्याना भरून टाकणारे खानदान.... हिंदी चित्रपसृष्टीतील प्रथम कुटुंब (first family) म्हणून मानांकित असणारे "कपूर" घराणे ! त्यांचा स्टुडिओ म्हणजे बॉलीवूडचा चालता बोलता इतिहास. अनेक तारे आणि तारका येथून उगवल्या आणि नंतर वर्षानुवर्षे चंदेरी दुनियेत चमचमत राहिल्या. तो स्टुडिओच आता इतिहासजमा होणार ? 'बॉबी' आला (की आली !) तेव्हा मला  मिसरूड सुद्धा फुटली नव्हती आणि 'राम तेरी गंगा मैली' च्या सुमारास मी हक्काने मित्रांबरोबर सिनेमा पाहू लागलो होतो. थोडक्यात सांगायचे तर माझ्यासारखे अनेक जण आर. के. च्या प्रवाहाबरोबर वाहत मोठे  झालो. पुण्याहून आजोळी मुंबईला जाताना आर. के. स्टुडिओ चा स्टॉप आला म्हणजे आपण मुंबईत शिरलो अशी पक्की खूणगाठ होती. त्याच्या  प्रवेशद्वारावर ते सुप्रसिद्ध युगुलाचे चित्र पाहून त्यामागील दुनियेत काय काय चालत असेल याचे कुतूहल वाटायचे.

आर. के. च्या चित्रपटासारखा काळ झपाट्याने सरकत गेला. राज कपूर काळाच्या पडद्यामागे जाऊन सुद्धा दशके लोटली. तरीही कपूर घराण्याचा वारसा आजतागायत शशी कपूर पासून ते करीना आणि रणबीर कपूर पर्यंत चालूच आहे. त्यांच्या चित्रपटांना चाहत्यांनी नेहेमीच भरभरून प्रेम (आणि पैसे सुद्धा) दिले. या पार्श्वभूमीवर आर. के. वर कायमचा पडदा  पडणार या कल्पनेने अस्वस्थ व्हायला झाले. हीच का ती वृद्धत्वाची चाहूल ! जी वास्तू इतिहासाची साक्षीदार आहे तीच आता इतिहास होणार हि कल्पना कठोर नाही तर काय ! त्याची देखभाल परवडत नाही यास्तव कपूर घराण्याने ती जागा विकण्याचा निर्णय घेतला. लवकरच तिथे टोलेजंग टॉवर किंवा झगमगीत मॉल उभा राहील. अर्थात कपूर कुटुंबाची ती खाजगी संपत्ती असून त्याचे काय करायचे हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक अधिकार आहे

माझ्या इंग्लंडमधील वास्तव्यामुळे असेल, पण  इतिहासाचे जतन कसे करावे हे त्यांच्या कडून शिकण्यासारखे आहे असे माझे मत आहे . ब्रिटिशांकडून आपण जे शिकलो त्यापेक्षा खूप काही शिकल्याची खंत मला वाटते. ऐतिहासिक वारसा कसा जपावा याचे एक उदाहरण देतो. मी तेव्हा लंडनच्या उत्तरेला स्टॅमफर्ड येथे राहात होतो. तेथून १५ किलोमीटर वर वुलेसथॉर्प या खेड्यात प्रख्यात शास्रज्ञ आयझॅक न्यूटनचे घर आणि त्याचे प्रसिद्ध सफरचंदाचे झाड होते. ब्रिटिशांनी त्याचा जन्म झाली ती खोली, ते सफरचंदाचे झाड शतकानुशतके जपून ठेवले आहे - नव्हे  तर त्याचे सुरेख राष्ट्रीय संग्रहालय  केले आहे.  त्याच आवारात शास्रीय  सिद्धांतावर आधारित प्रयोग आणि त्याची करमणुकीतून ओळख करून देणारी प्रयोगशाळा आहे. त्या झाडावर काही वर्षांपूर्वी वीज कोसळली. तर पुन्हा त्यावर कलम करून त्याला नव्याने उभारी दिली. त्या झाडाची सफरचंदे पाहून, त्याखाली बसण्याचा मोह आवारत नाही. असा एकेक वारसा त्यांनी पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर कपूर कुटुंबाला (त्याही पलीकडे भारतीयांना) आर. के. चा वारसा कायम स्वरूपी जपावा असे का वाटत नाही ? त्याचे दिमाखदार संग्रहालय उभारावे असे का वाटत नाही ? का तो वारसा फक्त आर. के. च्या डिजिटल फिल्म्स च्या रूपात पुरेसा आहे ?

कपूर म्हणतात कि त्याची देखभाल परवडत नाही. एके काळी आर. के. सिनेमाचा  फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे शेकडो चाहते होते. त्यांनी कपूरना भरभरून प्रेम आणि (परवडत नसताना) पैसे दोन्ही दिले आहे - हा किती विरोधाभास आहे... एक वेळ मान्य करू, की आर्थिक भार सोसत नाही. पण याच वास्तूचे  "आर. के. संग्रहलाय" केले तर एक जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ बनू शकते. असे संग्रहालय हासुद्धा किफायतशीर पर्याय आहे. दुर्दैवाची गोष्ट आपण भारतीयांत आहे की आपण सगळीकडे शॉर्ट कट घेतो. शेकडो गड आणि कोट यांचे पुनरुज्जीवन करण्यापेक्षा रेल्वे स्टेशन आणि विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले कि आपण कृतकृत्य होतो. पुढील पिढ्याना रायगड बघून शिवरायांच्या कर्तृत्वाची ओळख होईल की ब्रिटिश वास्तुरचनेचा नमुना असलेली रेल्वे ची इमारत पाहून ! शेवटी असे वाटते की  संपूर्ण समाज जिथे अशा गोष्टीत समाधानी आहे तिथे एकट्या कपूर घराण्याला का दोष द्यावा ?  

सुहास पानसरे 

Comments

  1. सुरेख शब्दबद्ध केलेले विचार. मनावर अनेक तरंग उमटवून गेले.

    ReplyDelete
  2. तुझे विचार मनोमन पटणारे....

    ReplyDelete
  3. सुरेख, सुहास. पुढील ब्लॉगच्या प्रतीक्षेत

    ReplyDelete
  4. काही मुद्दे निरुत्तर करणारे...

    ReplyDelete
  5. Apratim. Vichar manala bhidale. One excellent option could be to convert RK Studio into something like Ramoji Film City with Raj Kapoor theme. This will attract tourists from all over India.

    ReplyDelete
  6. अंतर्मुख करणारे विचार तरंग !!

    ReplyDelete
  7. बरोबर आहे तुझं की अशा ऐतिहासिक ठेव्यांची जपणूक करण्यात भारतीय मागे असतात. सामाजिक अनावस्था, सरकारी जाच कारणीभूत असेल का.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !

अस्पृश्य राजकारण

।।ग्राहक देवो भव ।।