इतिहासजमा
मागील आठवड्याच्या वर्तमानपत्रात छोटा लेख वाचला इतिहासजमा ! मे महिन्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरील घाटातील 'मिसिंग लिंक'चे उद्घाटन करून त्याला 'कनेक्टिंग लिंक' असे सार्थ नाव दिले. 'कनेक्टिंग लिंक' म्हणजे जोडणारा दुवा ! याविषयी आलेल्या लघुलेखामध्ये एक्सप्रेस वेवरील फूड-मॉल आता इतिहासजमा होईल असे म्हटले होते. पुणे-मुंबई प्रवासातील अनिश्चिततेचा घाट रस्ता आता वगळला जाऊन, वेळेची किमान अर्ध्या तासाची बचत या जोडणाऱ्या दुव्यामुळे होणार आहे. त्यामुळे प्रवासात अल्पोपहारासाठी थांबण्याची आवश्यकता उरली नाही. साहजिकच फूड-मॉलवरची गर्दी लक्षणीयरित्या कमी होईल आणि हा फूड-मॉल इतिहासजमा होईल असे या लेखात म्हटले आहे. हा लेख वाचताना माझं मन भूतकाळात गेलं. मी भारतभर अनेक राज्यात, आशिया, आफ्रिका , युरोप आणि अमेरिका खंडात विस्तृत प्रवास केला आहे. जगभर प्रवास केला तरी पुणे-मुंबई प्रवासाची लज्जत न्यारी ! असा माझा अनुभव आहे आणि मत आहे. लहानपणी आजोळी जाताना सकाळी लवकर उठून सिंहगड एक्सप्रेसने मुंबईला जाणे हा एक स...