।।ग्राहक देवो भव ।।
दैनंदिन जीवनातल्या लहान-सहान प्रसंगातील विसंगती खुमासदार पद्धतीने दाखवून देण्यामध्ये ‘ पुलं ’ चा हात कोणीच धरू शकणार नाही . "दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू म्हणजे गिऱ्हाईक! ' अशी पुणेकरांची खासियत त्यांनी सांगितली आहे. या अनुषंगाने पुणेरी दुकानदारांवर अनेक किस्से प्रसिद्ध झाले. फक्त पुणेच का - संपूर्ण भारत देशातच ग्राहक हा देवासमान आहे ही वृत्ती अभावानेच दिसे. इंग्लंड-अमेरिकेत किरकोळ चूक झाली तरी ग्राहकाला भरघोस भरपाई मिळते हे भारतात नवलाईने सांगितले जायचे. तिकडे प्रवास आणि निवास केल्यावर याचा अनेकदा प्रत्यक्ष अनुभव आला. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसा काळ बदलला आहे. ( "बदलता काळ" या माझ्या सुरुवातीच्या लेखात मी याबद्दल लिहिले आहे ) . या बदलत्या काळाचं एक परिमाण म्हणजे आपल्याकडे बदललेली ग्राहकाभिमुखता! पुण्याच्या अनेक मानदंडांपैकी एक म्हणजे ' चितळे बंधू मिठाईवाले '! दुपारी '१ ते ४ दुकान बंद' यावरून आजही अनेक कोट्या केल्या जातात (आता चितळ्यांचे दुकान दुपारी बंद नसले तरी). ‘ आमची कोठेही शाखा नाही ’ अशी शेखी मिरवायचे दिवस मागे पडले . आ...