हॅलो हॅलो बोलतंय कोण ! ! !
जून १९७६: "हॅलो ...हॅलो....अं .... कोण बोलतय. नीट ऐकू येत नाही. परत थोड्यावेळाने फोन करा...." जून २०२१: "हॅलो ...हॅलो....अं .... कोण बोलतय. नीट ऐकू येत नाही. परत थोड्यावेळाने फोन करा...." फोनच्या दोन कॉलमधे तब्बल ४५ वर्ष अंतर असूनसुद्धा भारतात फोनवर तोच संवाद ऐकू येतो (किंबहुना ऐकू येत नाही!). म्हणजे ४५ वर्षात काहीच सुधारणा किंवा बदल झाला नाही असं नाही. आज स्मार्टफोन घराघरात शिरला आहे. पण ४५ वर्षांपूर्वी, स्मार्टफोनचा मूळपुरुष - स्थितप्रज्ञासारखा एका जागी स्थिर असलेला - दणकट काळा फोन अजून घराघरात शिरला नव्हता. वीस-तीस घरांच्या वसाहतीत हा एखाद्याकडे विराजमान झालेला असायचा. सगळ्यांचे फोन आणि निरोप यावरून यायचे. कनेक्शन न मिळणे, चुकीचा नंबर लागणे असे रंग-ढंग तो दाखवायचा. सगळ्यात जास्त रुसून बसायचा तो ट्रंककॉलच्या वेळी! एक तर टेलिफोन एक्सचेन्जकडे ट्रंककॉलसाठी नोंदणी करावी लागत असे. त्यानंतर त्यांच्याकडून कधीही कॉल येईल म्हणून, ज्यांच्याकडे फोन आहे त्यांच्याकडे ताटकळत बसावे लागे. तासनतास वाट पाहिली तरी ट्रंक कॉलची लाईन मिळा...