छंदोपनिषद !
“घेई छंद मकरंद .....प्रिय हा मिलिंद ...मधुसेवनानंद स्वच्छंद ......!” पंडित वसंतरावांचे स्वर कानी पडत होते. ‘छंद’ या शब्दांनी माझं लक्ष वेधून घेतलं. नकळत भूतकाळात जाऊन आपण केलेले विविध छंद आठवले. काही बालिश तर काही स्वानंद देणारे....पण काळाच्या ओघात अलगदपणे निसटून गेलेले. १९७७-८०च्या आसपासचा तो काळ. सुट्टीतल्या छंदवर्गांचं फॅड अजून आलं नव्हतं. पण अनेक छंद आमच्या घरात घर करून असत. माझ्या आठवणीतला माझा पहिला छंद म्हणजे पक्ष्यांची पिसे जमविण्याचा. रस्त्यात मिळण्याऱ्या पक्ष्यांच्या पिसांना फारसा भाव नव्हता. चतुःशृंगीच्या जत्रेत विविध रंगांच्या पिसांच्या टोप्या मिळायच्या. अशी टोपी म्हणजे पिसांचे घबाडचं असे. पण सगळ्यात उठून दिसणारी पिसं मिळायची ती पक्षी संग्रहालयात. लोणावळ्याला राजमाची पॉइंटवर एक पक्षी संग्रहालय होतं. तेथील रंगीबेरंगी पक्ष्यांची पिसं मी गोळा केली होती. त्यातलंच एक सप्तरंगी पीस मला फार आवडलं होतं. शाळेत एकदा ते मित्रांना दाखवायला नेलं. कर्णिक नावाच्या मित्राने ते त्याच्या घरी नेलं. आमची परीक्षा झाली आणि मग मला त्याची आठवण आली. त्यानेसुद्धा निकालाच्य...