बंद कुपीतील दारफळ
मराठीतील महाकवी "गदिमा' यांनी "खेड्यामधले घर कौलारू" या गीतात खेड्याचं मोहक वर्णन केलं आहे. माझ्यासारख्या संपूर्ण शहरी माणसाच्या आयुष्यात आजपर्यंत खऱ्या अर्थाने एकच खेडं आलं आणि ते (किमान पक्षी त्यावेळेस) असं मनमोहक नक्कीच नव्हतं. गावाला वेस होती, पण गावात शिरणाऱ्या रस्त्याला दोन बाजूंना दोन चौकोनी खडक मांडले होते, तेच काय ती वेस आल्याची वर्दी द्यायचे. एकच एक रस्ता होता खरा पण त्याकाळी (७०-८० च्या दशकात) तो इतका कच्चा होता की धुळीने तो सदैव माखलेला असायचा. पार आणि चावडी असली तरी ती बहुतेकदा ओसाड असायची. पोरांनी पोरींवर लाईन मारावी इतके तिघेही (पोरं, पोरी आणि खेडं) पुढारलेले नव्हते. नदी होती, पण हा भाग (की अभागी भाग) कायम दुष्काळाच्या गर्तेत असल्याने त्याला पाणी आलेलं मला तरी आठवत नाही. त्यापुढे जाऊन विजेचा लपंडाव पाचवीला पुजलेला. त्यामुळे अंधार झाला की आहे तिथे स्वस्थ बसायची शिक्षा असायची. अशा खेड्यात मोहक आणि रोमॅंटिक ते काय वाटणार ? पण चाळीस वर्षे मागे वळून पाहताना त्यातील मजा काळाच्या ओघात कशी हरवून गेली याची जाणीव हुरहूर लावून जाते. दारफळ - महारा...