मुंबई पुणे मुंबई
महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक भावविश्वात पुणे -मुंबई प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या काही दशकात मराठी माणूस अमेरिका , यूरोप आणि इतरत्र जगभर फिरू लागला तरी पुणे-मुंबई प्रवासाची सर त्याला नाही. उगीच नाही वसंत बापटांनी "दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत" ही कविता लिहिली ज्यात या प्रवासाचे समर्पक वर्णन केले आहे. माझे आजोळ मुंबई ! त्यामुळे हा प्रवास म्हणजे माझ्या बालपणापासून आजपर्यंत सख्खा सोबती आहे. बालपण, तारुण्य आणि आता मध्यमवय असा माझा प्रवास पुणे मुंबई रस्त्यावरून होत गेला म्हटले तर अतिशयोक्ती नाही. कळायला लागल्यापासून मला या प्रवासातील एकेक मैलाचा दगड पाठ आहे. सकाळी ...नव्हे पहाटे ...उठून सहाची जनता एक्सप्रेस (तेव्हा तिचे 'सिंहगड’ असे नामकरण झाले नव्हते) पकडायची. बहुतेक वेळेस बाबा स्टेशन वर सोडायला यायचे. आईबरोबर मी आणि धाकटा भाऊ संजय अशी आमची प्रवासी टीम असायची. गाडी सुटली की शिवाजीनगर, खडकी गेलं की पुढची स्टेशन्स झोपेत निघून जायची. लोणावळा चिक्कीचे विक्रेते येऊन झोपमोड करायचे. खंडाळा...